राष्ट्रीयीकृत बँकांमधील कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या दोन दिवसांच्या संपाला सोमवारी केंद्र सरकारविरोधी निदर्शनाने सुरुवात झाली. शहरातील विविध बँकांमधील कर्मचाऱ्यांनी सकाळी चितळे रस्त्यावरील युको बँकेसमोर निदर्शने केली.
युनाईटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने (यूएफबीयू) अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी दोन दिवसांचा संप पुकारला आहे. कर्मचारी व अधिका-यांच्या दहाव्या द्विपक्षीय कराराबाबत केंद्रीय अर्थ खात्याच्या प्रतिनिधींशी झालेली चर्चा फिस्कटल्याने हा संप पुकारण्यात आला आहे. दरम्यान, या संपामुळे शनिवारचा अर्धा दिवस आणि रविवारच्या सुटीमुळे सलग तीन दिवस बँका बंद राहणार असल्याने ग्राहकांची तारांबळ उडाली आहे. सोमवारीच त्याची प्रचिती आली.
निदर्शनाच्या वेळी कॉ. कांतिलाल वर्मा, कॉ. सी. एम. देशपांडे, कॉ. वर्षां अष्टेकर, कॉ. एम. बी. काळे आदींची भाषणे झाली. या वेळी या वक्त्यांनी केंद्र सरकारच्या जनता व कर्मचारी विरोधी धोरणाचा निषेध केला. केंद्र सरकार व कर्मचारी संघटनांमधील नवव्या द्विपक्षीय कराराची मुदत दि. ३१ ऑक्टोबर १२ लाच संपली. मात्र पुढचा दहावा करार करण्यात केंद्र सरकार दिरंगाई करीत असून आता तर चर्चेलाही दिरंगाई होत आहे. हा करार तातडीने व्हावा यासाठी संघटना सतत प्रयत्नशील आहे. संघटनेच्या मागण्याही केंद्रीय अर्थ मंत्रालयाला मागेच सादर करण्यात आल्या आहेत. याबाबत मागच्या वर्षभरात केवळ सहा वेळा चर्चा झाल्या. मात्र त्यातही भारतीय बँक संघाने (आयबीए) नकारात्मक भूमिका घेतली. संघटनेच्या मागण्यांवर आडमुठे व वेळकाढू धोरण घेऊन आयबीएनेच हा संप लादला आहे अशी टीका या सर्व वक्त्यांनी केली.
वेतनवाढीबाबतही आयबीएने बँक कर्मचारी व अधिकाऱ्यांची थट्टाच केली असून, या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा या वेळी देण्यात आला. कॉ. उल्हास देसाई, कॉ. अर्जुन हजारे, कॉ. शिवाजी पळसकर, कॉ. उमाकांत पाटील, कॉ. जयश्री डावरे आदी या आंदोलनात सहभागी झाले होते.