दिल्लीतील धावत्या बसमध्ये तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कारामुळे देशभर समाजात जागृती निर्माण होत असून आता तरूण पिढीला जबाबदारीची जाणीव होण्यासाठी संस्कृतीची गरज आहे. ही संस्कृती विकसित झाली पाहिजे. त्यासाठी विद्यापीठे व महाविद्यालये संस्कृतीची प्रेरणास्थळे बनावीत, अशी अपेक्षा केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केली. तरुणांनी जीवनात मजा जरूर लुटावी. परंतु स्वैरतेने वागू नये, असा सल्लाही त्यांनी दिला.
सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरूपदी ज्येष्ठ रसायनशास्त्रज्ञ डॉ. एन. एन. मालदार यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा व त्यांच्या पत्नी शलिका मालदार यांचा सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते गौरवचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या डॉ. वा. रा. किलरेस्कर सभागृहात संपन्न झालेल्या या सत्कार सोहळ्याचे आयोजन हिराचंद नेमचंद वाचनालय व सोलापूर जिल्हा सामाजिक कार्य समितीने केले होते. या सत्कार सोहळ्याचे अध्यक्ष हि. ने. वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. पी. के.जोशी यांनी भूषविले. सामाजिक कार्यसमितीचे अध्यक्ष उल्हास पाटील यांनी स्वागत तर हि. ने. वाचनालयाचे कार्यवाह प्रा. डॉ. श्रीकांत येळेगावकर यांनी प्रास्ताविक केले.
केंद्रीय गृहमंत्री शिंदे यांनी, आता केवळ राजकीय पक्षांपुरती आव्हाने नसून ती देशासमोर उभी ठाकत आहेत. भ्रष्टाचार, वाढती गुन्हेगारी, सुरक्षा, घुसखोरी, बलात्कार असे अनेक प्रश्न असल्याचे व त्यास सामोरे जाण्याची क्षमता केंद्र सरकारमध्ये असल्याचे नमूद केले. शिक्षण क्षेत्रात वशिला नसावा तर गुणवत्ता असावी लागते. सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.मालदार हे रसायनशास्त्रात संशोधन करणारे ‘नेते’ आहेत, असा गौरवपूर्ण उल्लेख करीत शिंदे म्हणाले, समाजमन जेव्हा विचार करणाऱ्या मनाशी जोडले जाते, तेव्हाच समाजात क्रांती होते. जगातील क्रांत्या अशाच पध्दतीने झाल्या आहेत. विद्यापीठांमध्ये देश घडविणाऱ्या विचारांचे पाईक असलेले कुलगुरू व प्राध्यापक असले पाहिजेत. आज माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात भारत करीत असलेल्या प्रगतीबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना भीती वाटते. भारताने घेतलेली ही भरारी धडपडीतून झाली आहे. म्हणूनच आयुष्यात धडपड महत्त्वाची असते, असे मत शिंदे यांनी मांडले. २००३-०४ साली आपण मुख्यमंत्री असताना सोलापूर विद्यापीठाच्या उभारणीकामी केलेल्या प्रयत्नांचा उलगडा शिंदे यांनी केला. या विद्यापीठाला केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगाकडून ‘बारा ब’चा दर्जा मिळवून देण्यासाठी आपण निश्चित प्रयत्न करू. कदाचित येत्या मार्चअखेर हा दर्जा मिळू शकेलसुध्दा, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
यावेळी डॉ. पी. के. जोशी यांनी सोलापूर विद्यापीठाच्या माध्यमातून कला क्षेत्रात वेगळा ठसा निर्माण होण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हावेत. जेणेकरून या विद्यापीठात देशभरातून विद्यार्थी शिक्षणासाठी आकर्षित होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली. नूतन कुलगुरू डॉ.मालदार यांनी सत्काराला उत्तर देताना विद्यापीठाच्या वाटचालीसह आगामी काळात करायच्या कार्याचा वेध घेतला. मंजुषा गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले. तर प्रा. शंकरराव साळुंखे यांनी आभार मानले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Develop culture to make youths responsible shinde
First published on: 13-01-2013 at 08:52 IST