tv0352ठाण्याच्या नगरपालिका प्रशासनाचे १९८३च्या ऑक्टोबर महिन्यात महानगरपालिकेत रूपांतर झाले, तेव्हापासून खऱ्या अर्थाने ठाण्याची महानगराच्या दिशेने वाटचाल सुरू झाली. पूर्वेला शीळ, पश्चिमेला येऊर, दक्षिणेला मुंबई-मुलुंडपर्यंत ठाण्याने हातपाय पसरले. मोठमोठी गृहसंकुले, गगनचुंबी टॉवर्स, रुंद-मोठे रस्ते, उड्डाण पूल, मॉल्स, मल्टिप्लेक्स आदींनी शहराचा चेहरामोहरा बदलला.
आधुनिक ठाण्याची ही प्रगती पाहताना राजकीय, आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक इतिहासाबरोबर ठाण्याच्या भूगोलाचा इतिहासही आता लिहावा लागणार आहे. ठाणे खाडी आणि दक्षिणोत्तर धावणारा येऊरचा डोंगर या पंधरा ते वीस कि.मी.च्या चिंचोळ्या पट्टय़ात भूसंपादन करताना अनेक डोंगर फोडून अर्धीअधिक खाडी बुजविण्यात आली आहे. त्यासाठी शेकडो वृक्ष, दुर्मीळ वनस्पती, खारफुटी आणि त्यावर गुजराण करणारे भूजलचर, कीटक, पक्षी नष्ट झाले आहेत आणि त्याच वेळी काळासोबत धावणाऱ्या इतिहासाच्या पाऊलखुणाही हळूहळू पुसट होत चालल्या आहेत. नागलाकोट हे त्याचे अलीकडचे उदाहरण.
मुंबईला बिलगून असलेले ठाणे शहर म्हणजे मुंबईचे प्रवेशद्वार. त्यामुळे नोकरी-व्यवसायासाठी दूरवरून आलेल्या निरनिराळ्या जाती-धर्माच्या लोकांनी ठाण्यात घरे घ्यायला सुरुवात केली. सव्वाशे वर्षांपूर्वी (१८८१) ठाण्याची लोकसंख्या १४ हजार ४५६ होती. ८० वर्षांनी म्हणजे १९६१ ला ती एक लाख एक हजार १०२, त्यानंतर १९८१ ला ४ लाख ७२ हजार होती. मात्र गेल्या तीस वर्षांत ती २५ लाखांवर पोहोचली आहे. आज नवीन आलेल्या ठाणेकरांना ठाण्याचा पूर्वेतिहासाबद्दल इथले लोक, त्यांच्या जीवनपद्धती व संस्कृतीबद्दल, आज शिल्लक असलेल्या ऐतिहासिक वस्तू-वास्तूंबद्दल, महानगरात विलीन झालेली गावे आणि ग्रामदेवतांबद्दल, त्यांच्या उत्सव, पारंपरिक जत्रांबद्दल फारशी माहिती नाही. जुनेजाणते स्थानिक ठाणेकर ठाण्याच्या या बदलत्या रूपाकडे विस्मयाने पाहण्यात दंग आहेत, तेव्हा जे काल होते ते आजही आहे अशा ऐतिहासिक वास्तू, संस्था, व्यक्ती, स्थळनामे यांचा गेल्या ५०-६० वर्षांतील घटनाक्रम वर्तमानाच्या इतिहासातून उलगडण्याचा प्रयत्न उद्बोधक आणि मनोरंजकही होईल आणि नवीन आलेल्या ठाणेकरांना ठाणे आपलेही आहे, अशी आत्मीयता त्यांच्यात वाढीस लागेल.
२१ एप्रिल १९६४ हा दिवस ठाणेकरांच्या कायम लक्षात राहणारा आहे. भारताचे तत्कालीन संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते एकाच दिवशी न्यू गल्र्स स्कूल, नौपाडा इमारत, मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या नेताजी सुभाष पथावरील इमारत आदी प्रकल्पांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. तसेच महत्त्वाचे म्हणजे ठाणे नगरपालिकेला १०० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल ‘ठाणे नगरपालिका शतसंवत्सरी महोत्सव स्मृतिग्रंथ १८६३-१९६३’ या स्मृतिग्रंथाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते झाले. या स्मृतिग्रंथात नगरपालिकेच्या शंभर वर्षांच्या इतिहासाचा आढावा घेतला असून त्यात त्या वेळच्या नगरपालिकेचा नकाशा दिला आहे. यात ठाणे जेल, महागिरी, चेंदणी, मीठबंदर, कोपरी, बाराबंगला, नौपाडा, पाचपाखाडी, खोपट, कोलबाड आणि दस्तुरी नाका एवढय़ा परिसरात ठाणे शहर दाखवले आहे. पाचपाखाडीतून माजिवडय़ापर्यंत जाणारा पूर्व द्रुतगती मार्ग, नौपाडा ते दस्तुरी नाक्यापर्यंत जाणारा आग्रा रोड (लालबहादूर शास्त्री मार्ग) नौपाडा ते कोर्ट नाक्यावरून कळवा पुलाकडे जाणारा जुना मुंबई रस्ता, नौपाडा ते आग्रा रोड व शहराच्या मधून जाणारा रेल्वे स्टेशन, जांभळी नाका ते पुढे दस्तुरी नाका आणि तेथून कळवा पुलापर्यंतचा रस्ता या ठाण्याच्या जीवनरेखा होत्या. दस्तुरी नाका म्हणजे आताचा मीनाताई ठाकरे चौक किंवा कॅसल मिल नाका. आज कॅसल मिलच्या जागेवर समर कॅसल नावाचे मोठे गृहसंकुल उभे राहिले आहे. येथे आग्रा रोड, स्टेशन रोड आणि कळव्याकडे जाणारा रस्ता एकत्र आले आहेत. पूर्व द्रुतगती मार्ग नव्हता, तेव्हा ठाणे शहरात शिरण्याचा हा एकमेव मार्ग असल्याने ठाणे शहरात शिरणाऱ्या मालवाहू बैलगाडय़ा, मोटारगाडय़ांना येथे दस्तक किंवा जकात भरावा लागे. ती भरून वाहने व फिरस्ते व्यापारी शहरात जात, कॅसल मिलचा नाका ते श्रीरंग सोसायटीत (तेव्हा ही सोसायटी नव्हती) जाणाऱ्या रस्त्याच्या तोंडावर हे दस्तक किंवा जकात भरण्याचे कार्यालय होते. आता रस्ता रुंदीकरणात ते कार्यालय गेले आणि उर्वरित जागेत मोटार गॅरेज आली. काळ बदलला, राज्यकर्ते बदलले की स्थळांची नावेही बदलतात. कालचा दस्तुरी नाका कॅसल मिल नाका झाला आणि आता मीनाताई ठाकरे चौक असे त्याचे नामकरण झाले आहे.
ठाणे नगरपालिकेच्या या नकाशात आणखी एक महत्त्वाचा रस्ता दाखविला आहे, तो म्हणजे आंबेडकर चौक, खोपट ते पोखरण तलाव रस्ता. ठाणे हे तलावांचे शहर म्हणून प्राचीन काळापासून ओळखले जाते. पोखरण तलाव मात्र ब्रिटिश राजवटीत १८८१ साली बांधण्यात आला. या तलावामुळे जुलै १८८५ पासून नागरिकांना नळाचे पाणी मिळण्याची सोय झाली. त्या वेळी या तलावाचे क्षेत्रफळ ४२९४०० चौरस फूट होते व त्यात २७० लक्ष गॅलन पाणी साठत असे. त्या वेळी तलावाला एकूण ८४९३ रु. खर्च आला. मुंबईचे त्या वेळचे गव्हर्नर सर फग्र्युसन जेम्स यांच्याकरवी या योजनेचे उद्घाटन झाले. पण पुढे १८९९ साली पुरेशा पावसाअभावी तलावाची पातळी घसरली, म्युन्सिपाल्टीने तलावाच्या विस्ताराचे काम हाती घेतले. पण काही तांत्रिक अडचणींमुळे तलावाचे काम रखडले. त्यामुळे मुंबईच्या विरार, तानसा तलावातून पाणी विकत घ्यावे लागले आणि पुढे ठाण्याच्या वाढत्या लोकसंख्येमुळे मुंबईकडून पाणी घेण्याच्या ऋणातून अद्याप आपले ठाणे शहर पूर्णपणे मुक्त झाले नाही.
सदाशिव टेटविलकर