भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आज बुधवार, २६ डिसेंबर रोजी अन्नधान्य व रॉकेलच्या अपुऱ्या पुरवठय़ाबाबत जिल्हधिकारी राजाराम माने यांना भेटून शिष्टमंडळाद्वारे निवेदन देण्यात आले. या शिष्टमंडळात भाकपचे जिल्हा सचिव कॉ. दिलीप पवार, शहर सचिव कॉ. रघुनाथ कांबळे, कॉ. सतीशचंद्र कांबळे, एस. बी. पाटील, शिवाजी शिंदे, बी. एल. बरगे, महादेव आवटे, शिवाजी माळी, विलास माने आदींचा सहभाग होता.
या वेळी निवेदन स्वीकारून जिल्हाधिकारी म्हणाले, अन्नधान्याचे गोडाऊन अपुरे असून ६ हजार मे.टन क्षमता असलेले चार गोडाऊनचे काम लवकरात लवकर पूर्ण करून या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की केशरी कार्डधारकांना १० किलो गहू व ५ किलो तांदूळ मिळणे अपेक्षित असताना कार्डधारकांना मात्र ७ किलो गहू व १ किलो तांदूळ मिळत आहे. याबद्दल पुरवठा अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला. या वेळी बोलताना पुरवठा अधिकारी म्हणाले, शासनाकडून धान्यपुरवठा होतो त्या प्रमाणत ७ किलो गहू व १ किलो तांदूळ देत असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे रॉकेलचे प्रमाण माणशी ३ लीटर शहराला व ग्रामीण भागात २ लीटर याप्रमाणे शासनाकडे मागणी केली असता शासनाकडून एकूण मागणीच्या फक्त ३८ टक्के इतकाच पुरवठा होत आहे. त्यामुळे अपेक्षित रॉकेलपुरवठा होत नाही. याशिवाय गॅस पुरवठय़ाबाबतच्या तक्रारीही मांडण्यात आला. या वेळी पुरवठा अधिकाऱ्यांनी मागण्यांचा विचार करून लवकरात लवकर पुरेसा धान्यपुरवठा करणार असल्याचे आश्वासन त्यांनी शिष्टमंडळाला दिले.