कोल्हापूर शहरासाठी काळम्मावाडी थेट जलवाहिनी योजनेला मंत्रालयातून झालेल्या विरोधाचे जोरदार पडसाद मंगळवारी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत उमटले. योजनेला विरोध करणाऱ्या मंत्रालयातील तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांचा निषेध नोंदवित नगरसेवकांनी कोणत्याही परिस्थितीत शुध्द पाण्याचीही योजना झालीच पाहिजे, असा आग्रह सभेत धरला. या भूमिकेवरून अनेक सदस्य आक्रमक झाले होते. उपायुक्त संजय हेरवाडे यांनी प्रशासनाच्या वतीने याबाबत नव्याने प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. तर नगरसेवकांनी जिल्ह्य़ातील मंत्री व आमदारांनी या पाणी योजनेकरिता आपली ताकद पणाला लावावी, अशी मागणी केली. सभेत उद्यानांचे खासगीकरण, मालमत्ता हस्तांतरण या मुद्यांवरही चर्चा रंगली होती.
कोल्हापूर शहरासाठी काळम्मावाडी थेट पाईप योजना व्हावी, यासाठी सर्वाचे प्रयत्न सुरू आहेत. तथापि मंत्रालयात झालेल्या बैठकीत ही योजना अव्यवहार्य असल्याचा शेरा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मारला होता. परिणामी ही योजनाच आता धोक्यात आली असल्याने त्याचे पडसाद आजच्या सभेत उमटले. कोल्हापूर शहराची लोकसंख्या, पाण्याची स्थिती, पंचगंगा नदीचे अतिप्रदूषण हे मुद्दे लक्षात न घेताच मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी वातानुकूलित कक्षात बसून योजना अव्यवहार्य ठरविली आहे, अशी टीका करीत योजनेला विरोध करणारे मालिनी शंकर, जयंत भाटिया, मापन्नावर या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा निषेध नोंदविला. शारंगधर देशमुख, भूपाल शेटे, सत्यजित कदम, राजू लाटकर यांनी थेट पाईप लाईन योजनेसाठी नव्याने प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली.
महापालिका प्रशासनाने शहरातील उद्यानांचे खासगीकरण करण्याचे ठरविले आहे. हा विषय चर्चेला येताच नगरसेवकांनी त्यास तीव्र विरोध दर्शविला. खासगीकरणातून उद्यान विकसित करण्यामुळे सामान्य नागरिकांचा हक्क हिरावला जाईल, त्यांना मोकळेपणाने उद्यानांमध्ये फिरण्याचे स्वातंत्र्य लाभणार नाही, अशी टीका रवी इंगवले यांनी केली. उद्यानांचे खासगीकरण करण्याऐवजी महापालिकेचे कर्मचारी व काही स्वंयसेवी संस्था यांच्या माध्यमातून उद्यानांची दुरुस्ती व निगा चांगल्याप्रकारे ठेवली जावी, अशी सूचना करून इंगवले यांनी याकरिता काही स्वयंसेवी संस्थाही तयार असल्याची माहितीही सभागृहाला दिली.
मालमत्ता हस्तांतराच्या विषयावरही वाद झाला. रमेश लालवानी यांचा मालमत्ता हस्तांतरणामध्ये पुढाकार आहे. त्यांचा एलबीटी व हद्दवाढीला विरोध असल्याने त्यांचा प्रस्ताव मंजूर करावयास नको, अशी भूमिका शारंगधर देशमुख, भूपाल शेटे यांनी घेतली.
 महापौर-उपमहापौरांचा राजीनामा
मंगळवारी झालेल्या कोल्हापूर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेचे कामकाज संपल्यानंतर महापौर कादंबरी कवाळे यांनी उपायुक्त संजय हेरवाडे यांच्याकडे आपला राजीनामा सादर केला, तर उपमहापौर दिगंबर फराकटे यांनी कादंबरी कवाळे यांच्याकडे राजीनामा सादर केला. पुढील आठवडय़ात महापौर निवडीचा कार्यक्रम होण्याची शक्यता असून महापौरपदासाठी काँग्रेसच्या जयश्री सोनवणे यांची निवड निश्चित मानली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Disorder in kolhapur municipal corporation
First published on: 27-11-2012 at 09:41 IST