सलग तिसऱ्यांदा महापालिकेची सत्ता काबीज केलेल्या भाजपप्रणीत नागपूर विकास आघाडीत नागपूर महानगर क्षेत्र नियोजन समितीच्या निवडणुकीत बिघाडी झाली आणि आघाडीचे मते काँग्रेसच्या उमेदवाराला मिळाली. यामुळे आघाडीच्या तीन उमेदवारांचा पराभव झाला तर काँग्रेसच्या सर्व सहाही उमेदवारांनी बाजी मारली. राज्यात आणि महापालिकेत सत्ता असताना घडलेला हा प्रकार भाजपसाठी धक्कादायक मानल्या जात आहे.
या निडणुकीत सर्वच पक्षांकडून जोडतोडीचे राजकारण करण्यात आल्याचे दिसून येत आहे. नागपूर विकास आघाडीत असलेल्या अपक्षांनी भाजपची साथ सोडल्याचे दिसून येते. भाजपप्रणीत आघाडीच्या नगरसेवकांना फोडण्यात काँग्रेसने यश मिळवले. तर भाजपने शिवसेनेच्या निलंबित नगरसेविका मंगला गवरे यांना मतदान केले. शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार अलका दलाल यांना केवळ ३ मते मिळाली. शिवसेनेने अव्हरलेल्या गटाला भाजपने जवळ केल्याचे दिसून येते. याआधी सत्ताधारी भाजपने शिवसेनेतून निलंबित नगररसेवक शितल घरत यांना सभापतीपद दिले आहे. गवरे यांचा विजय हा त्यातील पुढचा टप्पा असल्याचे जाणकारांचे मत आहे.
या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांना देखील फटका बसल्याचे मानण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्र्यांशी जवळीक साधून असलेले परिणय फुके यांना विजयासाठी आवश्यक ७ मते पडलेली नाहीत. मुख्यमंत्री आणि अपक्ष नगरसेवक फुके यांची जवळीक न आवडणाऱ्या भाजपातील एका गटाने फुके यांच्या वाटय़ाची मते दुसरीकडे वळून मुख्यमंत्र्यांनाही इशारा दिल्याचे मानले जात आहे.
या निवडणुकीत शहरी भागातून २० जागांसाठी २५ उमेदवार रिंगणात होते. भाजपप्रणीत आघाडीचे १४ उमेदवार आणि काँग्रेसच्या सहा उमेदवारांनी कंबर कसली होती. बसपाचे दोन, शिवसेनेचे दोन आणि राँष्ट्रवादी काँग्रेसचा एक उमेदवार मैदानात होता. काँग्रेसला सर्व उमेदवार विजयी होण्यासाठी पहिल्या पसंती क्रमाकांच्या एका मताची आवश्यकता होती. काँग्रेसचे प्रशांत धवड यांची पाच मते होती. त्यांना नऊ मते पडली. त्यापैकी एक मत अवैध ठरले. याचा अर्थ धवड यांना भाजप आघाडीची चार मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रगती पाटील यांना दोन मतांची आवश्यकता होती. त्यांना दुसऱ्या क्रमांची मते मिळाल्याने त्या विजयी झाल्या. बसपाचे अभिषेक शंभरकर यांना पहिल्या पसंतीची मते मिळाली.

शहरी नागरी क्षेत्राच्या मतमोजणीच्या २० फेऱ्या झाल्या. शेवटय़ाच्या फेरीत चार उमेदवारांना प्रत्येकी पाच मते होती. यात मंगला गवरे, दीपक कापसे, अरुण डवरे आणि परिणय फुके यांचा समावेश होता. ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली. त्यात फुके बाद झाले. २० जागांपैकी १० भाजपला, काँग्रेसला सहा, बसपाला एक, राष्ट्रवादी काँग्रेसला एक, शिवसेनेला एक आणि भारिप बहुजन महासंघाला एका जागेवर विजय मिळाला.

ईश्वर चिठ्ठीने हरले फुके
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक असलेले परिणय फुके यांना ईश्वर चिठ्ठीने मात्र साथ दिली नाही. २० पैकी १७ जागा निश्चित झाल्या होत्या. उर्वरित तीन जागांसाठी चार दावेदार निर्माण झाले होते. कारण या चौघांना प्रत्येकी ५ मते होती. त्यामुळे ईश्वर चिठ्ठीने तीन विजयी उमेदवार निवडण्याचा निर्णय घेण्यात आला. उमेदवारांना चिठ्ठी उचलण्यास सांगण्यात आले. परिणय फुके यांनी काढलेल्या चिठ्ठीवर वगळण्यात यावे, असे लिहीले होते.