‘स्वच्छ नाशिक, सुंदर नाशिक’ असे ब्रिद मिरवणाऱ्या महापालिकेला स्वच्छतेविषयी असणारी ‘तळमळ’ सर्वज्ञात असताना सिंहस्थाच्या पाश्र्वभूमीवर, या उपक्रमात आता अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करण्याची तयारी सुरु झाली आहे. ‘मॅकेनिकल रोड स्वीपर’ या यंत्राच्या सहाय्याने प्रमुख रस्ते व दुजाभकांची यांत्रिकी पध्दतीने स्वच्छता करण्याचे नियोजन आहे. हे यंत्र कसे काम करते त्याचे बुधवारी प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून पालिका अधिकाऱ्यांनी अवलोकन केले. ही यंत्रणा खरेदी झाली नसताना त्याचा वापर रस्त्यांऐवजी केवळ दुभाजकासाठी करायचा असा पवित्रा काही अधिकाऱ्यांनी घेतला आहे.
सिंहस्थाच्या पाश्र्वभूमीवर, महापालिकेने दोन रोड स्वीपर करण्याचे निश्चित केले आहे. ही यंत्रणा खरेदी करणे अद्याप बाकी आहे. मॅकेनिकल रोड स्वीपर कसे काम करते याचे प्रात्यक्षिक बुधवारी यांत्रिकी विभागाकडून दाखविण्यात आले. एका वाहनावरील यंत्रणेच्या सहाय्याने रस्त्यावरील कचरा जलदपणे साफ करता येतो. परदेशात सार्वजनिक स्वच्छता राखण्यासाठी यासारखी यंत्रणा कायमस्वरुपी कार्यरत असते. सिंहस्थात नाशिक नगरीत लाखो भाविक दाखल होणार असल्याचे स्वच्छतेचे काम जिकिरीचे ठरणार असल्याचे लक्षात घेत आरोग्य विभागाने सिंहस्थासाठी स्वतंत्र आराखडा तयार केला आहे. त्या अंतर्गत तात्पुरत्या स्वरुपात हजारो कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. तसेच या स्वरुपाची दोन यंत्र खरेदी करण्याचा विषय विचाराधीन आहे. ही यंत्रणा दाखल झाल्यास अडचणीच्या जागेवरील स्वच्छतेचे काम योग्य प्रकारे करता येईल असे पालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या यंत्रणेच्या खरेदीसाठी पालिकेने सव्वा कोटी रुपये अंदाजित किंमत धरली आहे. महात्मानगर भागातील रस्त्यांवर यंत्रणेचे प्रात्यक्षिक पार पडले.
या स्वीपरमार्फत दिवसाकाठी ६० ते ७० किलोमीटरच्या रस्त्याची साफ सफाई करता येऊ शकते. पण, यंत्राचा वापर दुभाजकासाठी की प्रमुख रस्त्यांसाठी अथवा दोन्ही कारणांसाठी करावयाचा यामध्ये अधिकाऱ्यांमध्ये मतभेद असल्याचे लक्षात येते. रस्त्यांची साफसफाई कामगारांकडून करता येते. दुभाजकावरील धूळ व कचरा काढणे अडचणीचे ठरते. यामुळे स्वीपरचा वापर मुख्यत्वे रस्ता दुभाजक स्वच्छतेसाठी करण्याचे प्रयोजन असल्याचे काही अधिकाऱ्यांनी सांगितले. जी यंत्रणा दोन्ही कामे सहजपणे करू शकते, तिचा एकाच कामासाठी वापर करण्याच्या अट्टाहासामागील कारणे अनुत्तरीत आहेत.

स्वच्छता कामगारांची कमतरता
शहरात दैनंदिन स्वच्छतेच्या कामासाठी जवळपास १९०० कामगार कार्यरत आहेत. १० हजार नागरिकांसाठी २५ कामगार हा सर्वसाधारण निकष असतो. या कामासाठी दोन हजार कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. प्रमुख रस्ते व रस्ता दुभाजक स्वच्छतेचे काम यंत्रणेमार्फत करता येईल. पण, प्रात्यक्षिक पाहिल्यानंतर काही अधिकाऱ्यांनी स्वीपरचा वापर दुभाजकासाठी करणे योग्य ठरेल असे मत व्यक्त केले. वास्तविक, मनुष्यबळाची कमतरता असताना अशी यंत्रणा प्रभावीपणे वापरता येऊ शकते. पण, अधिकाऱ्यांन कर्मचारी कमतरतेचा मुद्दाही पुढे रेटायचा असल्याचे दिसून येते.