आयुष्यातलं श्रेयस आणि प्रेयसच हरपलं, तर मग उरतं काय माणसाच्या जगण्यात? कशाला जगायचं ते? आयुष्य संपवायची भीती वाटते म्हणून? की कुठल्या जबाबदाऱ्या निभावायच्या राहिल्यात म्हणून? की पुन्हा नव्यानं आयुष्याला भिडायची आस अदृश्यपणे बीजासारखी मातीआड जीव धरून असते म्हणून?.. या प्रश्नांची उत्तरं ज्याची त्यानंच शोधायची असतात.. आपापल्या िपड-प्रकृतीप्रमाणे! सगळ्यांनाच ते जमतं असं नाही. मग नशीब, परिस्थिती, माणसं यांना बोल लावत, किंवा अगदीच यापैकी कुणाला जबाबदार धरता येत नसेल तर स्वत:लाच दोष देत, आत्मक्लेश करून घेत, कण्हत, कुंथत, कुढत, रडत आयुष्य जगतात माणसं! भुतासारखी! त्यांच्या वेदनेवर मायेची फुंकर घालून सावरणारं कुणी भेटलं तर ठीकच; अन्यथा अंधाऱ्या गर्तेच्या भयाण पोकळीत खोल खोल कोसळत जातात मग ती.
अभिरामच्या बाबतीतही असंच काहीसं घडलंय. एकेकाळी अर्थपूर्ण रंगभूमीच्या ध्यासानं पछाडलेला, आयुष्याचं एकमेव भागधेय म्हणून ते स्वप्न उराशी कवटाळणारा अभि लौकिक यश मिळत नाही म्हणताना हळूहळू विझत गेलाय. भोवतालच्या सामान्य वकुबाच्या व्यक्तींच्या दिखाऊ यशाशी आपल्या पराभूततेची तुलना करत, त्यांच्या यशातलं फोलपण ठाऊक असूनही स्वत:शी उभा दावा मांडलाय त्यानं. हा घाव जिव्हारी लावून घेऊन कुढण्यानं काहीच निष्पन्न होणार नाहीए, हे त्याला कळतदेखील. पण वळत मात्र नाही. स्वाभाविकपणेच विकृतीच्या दिशेनं आपसूक पावलं वळू लागतात त्याची. त्याच्याही नकळत! त्यानंच निर्माण केलेल्या, किंवा करू पाहत असलेल्या आभासी जगात! रोज नवा डाव. नवी गोष्ट. नवं कथाबीज. त्याला आपल्या उत्स्फूर्त कल्पनाशक्तीनिशी खेळवत राहणं. अथकपणे. समोरचा भिडू मात्र या खेळात संपूर्ण अनभिज्ञ. तरीही खेळात सहभागी करून घेण्याच्या याच्या नवनव्या क्लृप्त्यांना कधी सहजपणे, कधी भांबावून, तर कधी याच्या आक्रमक शैलीमुळे बळी पडणारा! क्वचितच याला या खेळात हार पत्करावी लागते. बहुधा नाहीच. म्हणूनच तर रोज नव्या दमानं, नव्या जोमानं हा खेळ मांडतो. त्यात व्यत्यय आला की चिडतो. चरफडतो. खेळ ऐन रंगात असताना कुणी डिस्टर्ब करायला आलं, की त्याच्यावरही हा या ‘खेळा’चंच अस्त्र उगारतो आणि त्याला पळवून लावतो.
या खेळातला त्याचा जीवश्चकंठश्च साथी म्हणजे त्याचा फोन!
पण एके दिवशी तोच रुसतो. त्यामुळे अभि अस्वस्थ, बेचैन होतो. तशात बाहेर पावसाची जीवघेणी रिपरिप. तो खेळ सुरू करायला कमालीचा उतावीळ. त्यासाठी वर्तमानपत्रातल्या जाहिरातींतून त्यानं संभाव्य भिडूही निश्चित केलाय. जुना ऑर्गन विकू इच्छिणारी व्यक्ती! पण फोनच बंद म्हटल्यावर करता काय? त्याची तगमग चाललेली.
इतक्यात टेलिफोनचा लाइनमन येतो. भलतंच कुणी आलंय समजून आधी अभि त्याला कटवूच पाहतो. पण मग हाच आपला त्राता आहे कळल्यावर चिडचिडत त्याला घरात घेतो. तेही बेणं पोचलेलं. अखंड बडबडं. त्याच्या वटवटीला कंटाळून अभि त्याला आपला हिसका दाखवतो, तेव्हा कुठं स्वारीची टकळी बंद होते. तेवढय़ात आणखीही एकजण उपटतो. त्याला अभि ज्या तऱ्हेनं हाकलतो, त्यानं लाइनमनची खात्रीच पटते, की या माणसाची तार बहुधा सटकलीय, तेव्हा याच्या नादी लागण्यात अर्थ नाही.
टेलिफोन दुरूस्त होतो आणि अभिच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक येते. खेळाला सुरुवात करण्यापूर्वीची अनामिक हुरहूर, उत्सुकता अन् उत्कंठा मनात दाटलेली. खेळ सुरू होतो..
जाहिरातीतल्या ऑर्गन विकू इच्छिणाऱ्या व्यक्तीला अभि फोन लावतो. पलीकडून एका बाईंचा आवाज येतो- ‘मी भागवत बोलतेय..’
आता ‘खेळा’ला खऱ्या अर्थानं रंगत येणार!
ऑर्गनच्या किमतीपासून त्याच्या सद्य:स्थितीपर्यंत सविस्तर बोलणं होतं त्यांचं. ऑर्गनची ऐंशी हजार किंमत ऐकून अभिचं धाबं दणाणतं. काही कमी-जास्त करणार का, म्हणून विचारल्यावर भागवतबाई त्या ऑर्गनचा विशेष सांगतात. बालगंधर्वानी स्वत: निगुतीनं बनवून घेतलेला आणि वापरलेला हा ऑर्गन. म्हणूनच त्याचं हे मूल्य. नाइलाजानं तो विकावा लागतोय याची खंत बाईंच्या बोलण्यातून जाणवते. ऑर्गन न परवडणारा आहे. तो फोन कट् करतो.
पुन्हा थोडय़ा वेळानं तोच नंबर फिरवतो. आता ‘कर्नल बर्वे’ या नावानं. मिलिटरी खाक्यात. आक्रमक शैलीत. बाईंना जराही बोलू न देता आपलंच घोडं पुढं दामटत. ‘मुलीसाठी बाजाची पेटी विकत घ्यायचीय..’ म्हणत एक क्षुद्र वस्तू खरेदी करत असल्याचा एकूण आव. पलीकडे बाई हैराण. पण त्यांचं काहीच ऐकून न घेता उलट त्यांचा दीडदमडीचा ऑर्गन आपण विकत घेऊन त्यांच्यावरच उपकार करत असल्याची भाषा. आणि वर ‘आपल्यालाच ऑर्गन विका’ अशी धमकी. फोन कट्.
आता पलीकडची व्यक्ती कशी रिअॅक्ट झाली, याचे अभिचे ठोकताळे बांधणं सुरू होतं.  
हा खेळ असाच निरंतर सुरू राहतो. नव्या ओळखींसह. नवं नाव-गाव, नव्या अंदाजात.
अभि चक्रम आहे का? की त्याच्या डोक्यावर परिणाम झालाय? का असले उद्योग तो करतोय? काही केल्या पत्ता लागत नाही. मधेच त्याची एक मैत्रीण येते. तब्बल सात वर्षांनंतर त्यांची भेट होतेय. त्यांच्यात बरंच काही घडलंय खास. पण दोघांच्या बोलण्यातून नीट थांग लागत नाही. ती प्रेयसी असावी बहुधा त्याची. पण सगळे तरल पाश तोडल्यासारखं तो तिच्याशी तुटक बोलतो. वागतो. आपल्यात काहीच उरलेलं नसल्याचं ठासून सांगतो. ती जाते. अश्रूभरल्या डोळ्यांनी. आपलं अस्तित्व मागे ठेवून.. धुक्याचा आणखीन एक घनगर्द पडदा त्याच्या व्यक्तित्वाला लपेटून!
मधल्या व्यत्ययानंतर पुनश्च खेळ सुरू.. नव्या ओळखीसह.
राजीव मुळ्ये-किरण मानेलिखित आणि किरण माने दिग्दर्शित व अभिनित ‘श्रीचिंतामणी’च्या ‘ती गेली तेव्हा..’ या नव्या नाटकाची ही झलक! सुरुवातीला आपण एखादा एकपात्री प्रयोग पाहतोय की काय असं वाटत असतानाच हळूहळू आपण त्यात गुंतत जातो. अभि नावाच्या एका सर्किट माणसाचं वर्तमान आपल्यासमोर उलगडत जातं. प्रेक्षकांना धक्के देत, त्यांना कधी गुंतवत, तर कधी अलिप्त करत नाटक पुढं पुढं सरकतं. रंगमंचावरचं पात्र आणि रंगमंचावर कधीच न येणारं दुसरं पात्र यांच्यातल्या संवाद, विसंवाद आणि असंवादातून घडणारं हे नाटय़ चढत्या रंगतीनं खुलत जातं. मधे मधे येणारी लाइनमन बुवा वीरकर, होतकरू अभिनेता प्रणव, मैत्रीण वैजू ही पात्रं तशी पाश्र्वभागीच राहणारी. खरं नाटक घडतं ते अभि आणि दूरध्वनीवरून बोलणाऱ्या भागवतबाईंच्यातच. मधेच एका प्रसंगात अभि टीव्हीवरच्या ‘दळण’दार मालिका आणि त्यांत काम करणारे पोटार्थी कलावंत वगैरेंवर छद्मीपणे शेरेबाजी करतो. त्यातली तिडिक त्याच्यासारख्या सच्च्या कलावंतांच्या घुसमटीचा उद्गार म्हणून आलेली. सवयीनं काहीही अर्थहीन बघत बसणाऱ्या टीव्हीच्या प्रेक्षकांना रंजक, तरीही अर्थपूर्ण कला म्हणजे काय असते, हे अभि त्याच्या ‘खेळा’तून दाखवू बघतो. त्या खेळात तो इतका रंगतो, की गमतीचा हा खेळ, आपल्या प्रत्यक्षायुष्यातील गुंता आणि खेळात जबरदस्तीनं ओढलेल्याची त्यात होणारी फरफट यांचंही भान त्याला उरत नाही. विकृतीच्या गर्तेत तो कोसळत जातो. आपला हा ‘खेळ’ कुणाच्या जिवावरही बेतू शकतो, हे ज्या क्षणी त्याला जाणवतं, त्याच क्षणी नेमकी वैजूही तिथं पोचते. त्याला भानावर आणते. आत्मश्लाघा करून आयुष्य नासवण्यात अर्थ नाही, आपली ‘ओळख’ आपणच निर्माण करायची असते. यश आणि अपयश या सापेक्ष गोष्टी आहेत. त्याकडे आपण कसं पाहतो, त्यावर ते ठरतं. त्यानं आपणहून दूर केलेली वैजू आणि त्याची ‘ओळख’ एकाच वेळी परतते. आणि अर्थातच..
राजीव मुळ्ये आणि किरण माने या द्वयीनं नाटकाची रचना अत्यंत बुद्धिमानीनं केली आहे. त्यातले सततचे धक्के आणि नाटय़पूर्ण कलाटणी यांमुळे प्रेक्षक खुर्चीला खिळतात. खरं पाहता हे तसं द्विपात्रीच नाटक. अन्य पात्रं तशी दुय्यम. परंतु ती नसती तर नाटकात ‘रीलिफ’ नसल्यानं ते भरकटलं असतं. किरण माने यांनीच त्याचं दिग्दर्शन आणि प्रमुख भूमिका केल्यानं त्यांच्या मनात असलेलं नाटक रंगमंचावरही त्याच उत्कटतेनं (्रल्ल३ील्ल२्र३८) अवतरलं आहे. मनोविश्लेषणाच्या अंगानं आणि वरकरणी घटना-प्रसंगांतून आकारणारं हे नाटक करायला अत्यंत कठीण आहे यात तीळमात्र शंका नाही. मात्र, दस्तुरखुद्द लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता या नात्यानं किरण माने यांनी हे शिवधनुष्य लीलया पेललं आहे. मनोविकृतीच्या टोकापर्यंत जाऊनही नॉर्मल वाटणाऱ्या सहजतेनं त्यांनी हा उंदरा-मांजराचा ‘खेळ’ ज्या सूक्ष्म तपशिलांनिशी मंचित केला आहे, त्याला तोड नाही. त्यांच्यातल्या अभिनेत्याचा आणि दिग्दर्शकाचाही यात कस लागला आहे आणि दोघंही खरे उतरले आहेत. त्यांची आवाजावरची हुकूमत तर अलीकडच्या काळात कुठल्याच अभिनेत्यात आढळून येत नाही. भूमिकेची समज, त्यात झोकून देणं आणि तरीही त्यापासून अलिप्त राहणं- ही त्यांची त्रिविध कामगिरी लाजवाब. दूरध्वनीवरील भागवतबाई- नीलिमा दामले यांनीही आपल्या भूमिकेतले ताणेबाणे उत्तम वठवले आहेत. त्यांच्याशी सुयोग्य ताळमेळ राखत घटना-प्रसंग रंगवण्यातलं किरण माने यांचं कसब अ-फ-ला-तू-न! वैजू झालेल्या योगिनी चौक यांनीही त्यांना छान साथ दिली आहे. तीच गोष्ट रोहित चव्हाण (बुवा वीरकर) आणि अजिंक्य ननावरे (प्रणव) यांची!
तांत्रिक बाबीही उत्तम! एक आगळा नाटय़ानुभव देणारं ‘ती गेली तेव्हा..’ कदापि चुकवू नये असंच!