साहिब, बिवी और गँगस्टरप्रमाणेच ‘रिटर्न्‍स’मध्येही प्रेमाचा त्रिकोण असेल, असा अंदाज करत असलात तर भलताच गैरसमज होईल. ‘रिटर्न्‍स’मध्ये लक्षवेधी संवाद आणि उत्तम अभिनयाबरोबर अधिकच गुंतवून टाकणारी त्रिकोणापलीकडची गोष्ट आणि त्यातला थरार अनुभवायला मिळतो. सिक्वेलपट असूनही समान कथानकाच्या ढाच्यापलीकडे जात पहिल्या चित्रपटापेक्षा दुसरा चित्रपट अधिक सरस ठरण्याची कामगिरी ‘साहिब, बिवी और गँगस्टर रिटर्न्‍स’ने केली आहे, असे म्हणता येईल. सर्वसामान्य प्रेक्षकांना पूर्वाश्रमीचे संस्थानिक राजे असलेले आताच्या काळात फक्त राजकारणातील प्यादे बनले आहेत आणि एका तरुणीच्या प्रेमात पडल्यानंतर संस्थानिक विलासी राजा बायकोला सोडून तिच्याशी विवाह करायचा म्हणून सारे काही करतोय असे वाटूही शकते. परंतु प्रत्यक्षात संस्थानिक राजांच्या विलासीपणाच्या पलीकडे सिनेमा जातो आणि परिस्थिती बदलताच माणूस आपली जुनी नाती, प्रेम आणि वागणे यात किती सहजपणे बदल करू शकतो आणि हाच कलियुगाचा कसा मंत्र बनला आहे, यावर अतिशय बेमालुम पद्धतीने दिग्दर्शक प्रकाशझोत टाकतो. हा बदल प्रेक्षकही सहजपणे स्वीकारू शकतो कारण चार प्रमुख पात्रांच्या आयुष्यातील परिस्थिती आमूलाग्ररीत्या बदलते आणि मग ती चारही पात्रे नायक, नायिका, खलनायक या छटांच्या पलीकडे जाऊन वागू लागतात. ‘रिटर्न्‍स’मध्ये याची अप्रतिम झलक पाहायला मिळते.
साहिब म्हणजेच आदित्य प्रताप सिंग (जिमी शेरगिल) आता संस्थानिक म्हणून आपले वजन सांभाळण्यात थोडासा यशस्वी ठरलाय. परंतु, त्याचे पाय अधू झाले आहेत. व्हीलचेअरवर असला तरी साहिब त्याचा रुबाब आणि समाजावर असलेली जरब तसेच राजकारणात असलेले महत्त्व तो टिकवून आहे. पूर्वपरंपरागत मिळालेल्या आलिशान, भव्यदिव्य महालात राहणाऱ्या साहिबच्या बायकोशी छोटी रानी (माही गिल) हिच्याशी त्याचे पटत नसते, तिचेही त्याच्याशी पटत नसते. छोटी रानी खरे तर या परिसरातील लोकप्रतिनिधी आहे. पण आमदार असली तरी तिला राजकारणातले काहीही कळत नाही. त्यामुळे साहिब सांगेल तिथे सह्य़ा करणे एवढेच तिच्या हातात आहे. नवऱ्याचे आपल्यावर प्रेम नाही म्हणून ती अखंड दारू पीत राहते. ‘गँगस्टर’च्या पहिल्या भागात नवऱ्याचे प्रेम मिळविण्यासाठी धडपडणारी छोटी रानी आता त्याचा तिरस्कार करू लागली आहे. साहिबचा तिरस्कार करण्याची एकही संधी ती दवडू इच्छित नाही. छोटी रानीच्या बुद्धीची कुवत किती आहे हे ठाऊक असल्यामुळेच अपंग झाला असला तरी साहिब आपले वर्चस्व टिकवून आहे. दुसरीकडे साहिबच्या घराण्यामुळे आपले राजघराणे बरबाद झाले, या रागापोटी आपला पूर्वपरंपरागत महाल आणि वैभव परत मिळवायचे असेल तर साहिबला संपविला पाहिजे, या ईर्षेने इंद्रजित सिंग अर्थात गँगस्टर (इरफान खान) पेटला आहे. योगायोगाने परिस्थिती अशी निर्माण होते की, गँगस्टरची प्रेमिका असलेली रंजना (सोहा अली खान) या दुसऱ्या राजघराण्यातील बीरेंद्र प्रताप (राज बब्बर) यांच्या मुलीचा विवाह नाईलाजाने साहिबशी ठरविला जातो. प्रदेशातील राजकीय स्थिती बदलते, डावपेच नव्याने टाकले जातात. तसेच राजकारण नात्यांमध्ये सुरू होते. या नात्यांच्या राजकारणाचा समर्पक पद्धतीने वेध दिग्दर्शकाने घेतला आहे.
प्रत्येक व्याक्तिरेखा आपल्याला अनुरूप परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न करून आपल्या मनासारखे करवून घेण्याच्या सतत प्रयत्नात असते. गँगस्टरचे राजघराणे आणि गतवैभव कधीच लयास गेले आहे. स्थानिक राजकारणात मिळेल तिथे आपले फोटो छापून आणणे, त्यासाठी पैसे मोजणे आणि राजघराणे लयास गेले असले तरी लोक आपल्याला ‘राजाभैय्या’ असेच पुकारतात याचीही इंद्रजित सिंगला फुकाची गुर्मी आहे आणि ती तो शालीनतेने मिरवायचा प्रयत्नही करतो. राजघराण्यातील रंजना (सोहा अली खान) हिचा फोटो पाहताक्षणी साहिब तिच्याशी लग्नाचा प्रस्ताव ठेवतो. तो प्रस्ताव बीरेंद्र प्रताप (राज बब्बर) याने मान्य करावा म्हणून रंजनाच्या दुबईतील भावाला अमलीपदार्थाच्या प्रकरणात अडकवतो आणि चित्रपटातील संस्थानिकांच्या राजकारणाबरोबरच नात्यांमधील राजकारणाला सुरुवात होते. त्यामुळे अर्थातच रंजनाचा विवाह साहिबशी ठरतो, पण त्यातही कपट कारस्थान असते. हे कपट कारस्थान, त्यातून निर्माण झालेला गुंता, गँगस्टर-रंजना यांचे प्रेम, साहिब-छोटी रानी यांच्यातील नात्यांचा संघर्ष आणि एकूण प्रदेशातील वास्तविक राजकारणाचे नाटय़ याची गुंफण करून कमालीच्या परिणामकारक संवादांतून चित्रपट उलगडत जातो.
साहिब, गँगस्टर, छोटी रानी यांच्या तोंडी असलेले संवाद हे चित्रपटाचे बलस्थान ठरले आहे. सेक्स, राजकारण आणि नातेसंबंध यावरही चित्रपट भाष्य करून जातो. लॅपटॉपवर पोर्न फिल्म पाहणारा राजकारणी, मुलाखत घ्यायला पत्रकार येतो तेव्हा त्याचा लॅपटॉप बंद होत नाही आणि त्याची फजिती होते. अशा छोटय़ा छोटय़ा प्रसंगांतून चित्रपट फुलविला आहे. माही गिल, जिमी शेरगिल यांचा अभिनय हेही बलस्थान म्हणता येईल. माही गिलने साकारलेली छोटी रानी भाव खाऊन जाते.
साहिब, बिवी और गँगस्टर रिटर्न्‍स
निर्माते – तिग्मांशू धुलिया,
नितीन तेज आहुजा, राहुल मित्रा
दिग्दर्शन आणि संवाद – तिग्मांशू धुलिया
पटकथा – तिग्मांशू धुलिया, संजय चौहान
कलावंत – सोहा अली खान, इरफान खान, जिमी शेरगिल, माही गिल, राज बब्बर, दीपराज राणा, प्रवेश राणा, राजीव गुप्ता, सीताराम पांचाळ, राजेश खेरा, सुजय शंकरवार, अंजना सुखानी, मुग्धा गोडसे व अन्य.