पाण्याचा पुरेसा साठा असतानाही जलवाहिनीच्या गळतीमुळे कोल्हापूरकरांची पाण्यासाठी धावपळ उडाली आहे. जवळपास निम्मे शहर पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहिले आहे. गळतीचे काम अविश्रांत सुरू असले तरी शुक्रवारपर्यंत पाणीपुरवठा होण्याची शक्यता कमी आहे.     
कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शिंगणापूर पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीला गळती लागली आहे. गळती काढण्याचे काम जलअभियंता मनीष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी असे ७० जण कार्यरत आहेत. नळजोडणीचे आव्हानात्मक काम या पथकासमोर आहे. हे काम आज रात्री पूर्ण होणार आहे. त्यानंतर स्लॅब टाकण्याचे काम केले जाणार आहे. नंतर चाचणी घेतली जाणार आहे. ती योग्य झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे.     
गळतीचे काम अखंडित सुरू असले तरी शहरवासियांना पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागले आहे. शहरातील ४० टक्के भागातील पाणीपुरवठा दोन दिवसांपासून बंद आहे. त्याची तीव्रता आता जाणवू लागली आहे. नागरिक टँकरमधून पाणी मिळण्यासाठी धावपळ करू लागले आहेत. तर नगरसेवक टँकर मिळविण्यासाठी प्रशासनाशी वाद घालताना दिसत आहेत. टँकर पळवापळवी होऊ  नये यासाठी प्रशासनाने दोन प्रभागासाठी एक टँकर असे वाटप केले आहे. त्यामुळे मोठय़ा प्रभागांना टँकरमधून पाणी पुरविताना  प्रशासनाची दमछाक होऊ लागली आहे. गळतीचे काम पूर्ण कधी होते आणि पाणीपुरवठा नियमित कधी होतो याकडे शहरवासियांचे लक्ष वेधले आहे.