आपली आवड-नावड, मते, दृष्टिकोन, कुटुंबीय किंवा मित्रमैत्रिणींसोबतची छायाचित्रे वा मजकूर इतरांसोबत शेअर करण्याचे हक्काचे माध्यम असलेल्या ‘फेसबुक’वरील ‘सोशल नेटवर्किंग’लाही आता जनरेशन नेक्स्ट कंटाळू लागली आहे. पालकही नाक खुपसू लागल्याने फेसबुकच्या ‘सामाजिक ओझ्या’ला वैतागलेल्या तरुणांचा ओढा झपाटय़ाने ट्विटर, इन्स्टाग्राम, मायस्पेससारख्या अन्य सोशल नेटवर्किंग माध्यमांकडे वळू लागला आहे.
झटपट संदेश पोहोचविणारे ट्विटर वा आपण काढलेली छायाचित्रे इतरांसोबत शेअर करणारे इन्स्टाग्राम यांना आता तरुणांची पसंती मिळू लागली आहे. ‘फेसबुक आता ‘बोअर’ झाले आहे. त्यावर कोणी काहीही शेअर करत असते. त्यामुळे, रोजच्या रोज फेसबुक पाहणे मी बंद केले आहे. फक्त छायाचित्रेच इतरांसोबत शेअर करायची असतील तर मी इन्स्टाग्रामला पसंती देतो,’ असे मुंबईच्या ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’चा (आयआयटी) विद्यार्थी केतव मेहता सांगतो. इन्स्टाग्राम हे छायाचित्रे पाठविण्याचे वेगवान आणि गंमतीशीर माध्यम आहे. आपण काढलेले छायाचित्र फिल्टरमधील पर्याय वापरून बदलता येते. इन्स्टाग्रामवरून ही छायाचित्रे फेसबुक, ट्विटर, टम्ब्लरवरही शेअर करता येतात. त्यामुळे, तरुणांमध्ये हे माध्यम लोकप्रिय होत चालले आहे. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात होणारे नवनवीन बदल सर्वप्रथम आयआयटीच्या पवई येथील कॅम्पसवर दिसून येतात. केतव आता अमेरिकेत असतो. पण, आपल्या आयआयटी कॅम्पसवरील मित्रांशी तो इन्स्टाग्रामच्या माध्यमातून सतत जोडलेला असतो.
पालक, शिक्षक यांच्या फेसबुकवरील शिरकाव्यामुळे हे माध्यम आता आपले राहिले नाही, अशी भावना मुलांमध्ये आहे. ‘मी माझे फेसबुकवरील अकाऊंट बंद केलेले नाही. पण, त्याला रोजच्या रोज भेट देणे नक्कीच कमी केले आहे,’ असे बीएच्या पहिल्या वर्षांला शिकणारी मेघना गोडबोले सांगते. मुले आता ट्विटर वा इन्स्टाग्रामवर अधिक काळ आढळून येतात. ही माध्यमे अजून तरी ‘पालक’ व ‘शिक्षक’मुक्त असल्याने बेधडकपणे ‘वावरता’ येते असे त्यांचे म्हणणे आहे.
सोशल नेटवर्किंगच्या दुनियेतून फेसबुकची होणारी पिछेहाट हे दृश्य केवळ भारतातले नाही. तर जगभरातील तरुणाई ‘फेसबुक’ला ‘आता बस्स’ म्हणू लागली आहेत. सोशल नेटवर्किंगच्या दुनियेत संशोधन करणाऱ्या ‘प्यू रिसर्च सेंटर’ने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या आपल्या अहवालातही १२ ते १७ वर्षे वयोगटातील मुले मोठय़ा संख्येने फेसबुकला कंटाळू लागली आहेत, असे निरीक्षण नोंदविले आहे. फेसबुक हे मुलांना ‘सोशल बर्डन’ वाटू लागले आहे, असे निरीक्षण हा अहवाल नोंदवितो. या शिवाय एखादे अकाऊंट, मजकूर वा ग्रुप ‘डिलीट’ करण्याची सोय फेसबुकवर आहे. हे कारणही फेसबुकची लोकप्रियता घसरण्यास कारणीभूत ठरल्याचे मत या अहवालात मांडण्यात आले      आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Facebook now thats it
First published on: 25-05-2013 at 12:38 IST