माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांच्या निमित्ताने जिल्ह्य़ातील काँग्रेसमधील गटबाजी चव्हाटय़ावर आली. एक कार्यक्रम जिल्हा काँग्रेसतर्फे, तर दुसरा जालना शहर काँग्रेसतर्फे घेण्यात आला. दोन्ही कार्यक्रमांना वेगवेगळे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
जिल्हाध्यक्ष भीमराव डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात माजी आमदार, ज्येष्ठ नेते धोंडिराम राठोड यांचे विलासरावांच्या जीवनकार्यावर भाषण झाले. स्वातंत्र्यसैनिक गौरव समितीचे जिल्हाध्यक्ष विक्रमराव घुगे, सदाशिव गाढे, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षा विमलताई आगलावे, अंकुशराव राऊत, काँग्रेस सेवादलाचे जालना तालुकाध्यक्ष प्रशांत वाढेकर, एल. के. दळवी यांच्यासह विविध तालुकाध्यक्ष या वेळी उपस्थित होते. शहर काँग्रेसतर्फे माजी आमदार शकुंतलादेवी शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास शहराध्यक्ष अब्दुल हफीज, माजी जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर भांदरगे व आर. आर. खडके, प्रभाकर पवार, महिला काँग्रेस शहराध्यक्षा विमलताई आगलावे यांची भाषणे झाली.
जालना शहर काँग्रेसच्या कार्यक्रमास जिल्ह्य़ातील अनेक पुढारी उपस्थित होते. शहर सरचिटणीस मोहन इंगळे, राजेंद्र राख, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. सत्संग मुंढे, निवृत्ती डाके, शरद देशमुख, सुभाष कोळकर, राजेंद्र गोरे, करीम बिल्डर, ज्ञानेश्वर कदम, सुबोधकुमार जाधव आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमानंतर शहर काँग्रेसची मासिक बैठक घेण्यात आली. प्रदेश सरचिटणीस अरुण मुगदिया यांची जिल्हा प्रभारीपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव संमत करण्यात आला.
स्वतंत्र कार्यक्रमासंदर्भात शहराध्यक्ष हफीज यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. परंतु त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले की, जिल्हा काँग्रेसने श्रद्धांजली सभेच्या कार्यक्रमाचे वृत्त देताना पक्षाच्या विविध आघाडय़ांच्या अध्यक्षांची नावे दिली असली, तरी त्यातून शहराध्यक्षांचे नाव मात्र वगळले. यापूर्वीही काही वेळेस असाच अनुभव आला आहे. ही बाब शहर काँग्रेसतर्फे जिल्हा प्रभारी मुगदिया यांच्या कानावर घालण्यात आली. जिल्हा काँग्रेसच्या कार्यक्रमाकडे शहर काँग्रेसचे पदाधिकारी फिरकलेही नाहीत.
जिल्हाध्यक्ष डोंगरे यांनी सांगितले की, विलासरावांच्या स्मृतिदिनानिमित्त शहर काँग्रेसचा स्वतंत्र कार्यक्रम झाला असला, तरी त्यात काही वेगळे घडले, असे नव्हे. कारण प्रत्येक तालुकाध्यक्ष व जालना शहराध्यक्षांनी आपापल्या घटक संघटनांचे स्वतंत्र कार्यक्रम  घ्यावेत, अशा सूचनाच पक्षाने दिल्या आहेत. घटक संघटना आपापले कार्यक्रम घेतल्यानंतर जिल्हा काँग्रेसच्या कार्यक्रमातही सहभागी झाल्या. जिल्हा काँग्रेसच्या निमंत्रणावर तालुकाध्यक्ष वा शहराध्यक्षांची नावे नसतात. त्यामुळे जालना शहराध्यक्ष वा शहर काँग्रेसचे नाव वगळल्याचे कोणाला वाटत असेल तर त्याला अर्थ नाही. जालना शहराध्यक्षांप्रमाणे बदनापूर, जाफराबाद, भोकरदन तालुकाध्यक्षांची नावेही आवाहनात नव्हती. परंतु ते मात्र जिल्हा काँग्रेसच्या कार्यक्रमास उपस्थित होते.