केंद्रीय विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांनी शिकावयाची तिसरी भाषा जर्मन असावी की संस्कृत या विषयावरून देशभर वाद-प्रवाद झालेत आणि मूळ भाषा शिकण्याचा मुद्दा बाजूला पडून राजकारण अधिक झाले. मात्र, कोणताही सरकारी आदेश नसताना केवळ भाषेची आवड म्हणून आपणहून संस्कृत शिकणारे आणि दैनंदिन व्यवहारात तिचा उपयोग करणारे भाषाप्रेमीही आहेत. अगदी नागपुरातही असे रोजच्या जगण्यात संस्कृतला स्थान दिलेले परिवार असून त्यांनी संस्कृतला आपलेसे केले आहे.
गीर्वाणभाषा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संस्कृतशी या परिवारांचा कुठल्यातरी वळणावर परिचय झाला आणि संस्कृतच्या गोडव्याने त्यांच्या मनात घर केले. आज हे परिवार स्वत: संस्कृत तर वापरतातच, शिवाय इतरांनी या प्राचीन भाषेचा आस्वाद घेऊन बघावा यासाठीसुद्धा प्रयत्नरत आहेत. महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीमध्ये अतिरिक्त कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत असणारे नरेश पांडे यांनी वयाच्या ३८ व्या वर्षी संस्कृत शिकण्यास प्रारंभ केला. संस्कृत संबंधी विविध परीक्षा दिल्यावर त्यांनी पत्नीसमवेत जाऊन दिल्ली येथील संवाद शाळेत संस्कृत संभाषणाचे प्रशिक्षणही घेतले. आज, पांडे पती-पत्नींसह त्यांची अभियंता असलेली मुले देखील संस्कृत संभाषण करू शकतात. त्यांचा कॅनडा येथे सध्या वास्तव्यास असलेला मुलगा संस्कृत बोलतो म्हणून अनेक लोक त्याला आवर्जून भेटून जातात, असेही पांडे यांनी सांगितले. चंद्रपूर जिल्ह्यात असताना त्यांनी माडिया या आदिवासी जमातीतील मुलांनाही संस्कृतात संवाद साधायला शिकवले होते. आजही ते संस्कृत प्रशिक्षणाचे वर्ग घेतात. या व्यतिरिक्त, आता व्हॉट्सअ‍ॅप सारख्या आधुनिक समाजमाध्यमांचा वापरही त्यांनी याकरिता सुरू केला आहे. आपल्या ओळखीच्या लोकांना तसेच संस्कृतप्रेमींना व्हॉट्सअ‍ॅपद्वारे अमरकोशातील एक श्लोक रोज पाठविण्याचा शिरस्ता त्यांनी घालून घेतला आहे.
संस्कृतमध्ये एम.ए. केलेल्या धनश्री मालगे यांचे कुटुंबदेखील असेच दैनंदिन संभाषणात संस्कृतचा वापर करणारे आहे. धनश्री स्वत:, त्यांची आई व बहीण या सुरुवातीला संस्कृतमधून बोलावयास शिकल्या आणि नंतर त्यांच्या वडिलांनी पण ही भाषा आत्मसात केली. आज मालगे कुटुंबातील सदस्य एकमेकांशी याच भाषेत बोलतात. ‘प्रवासात आमचे संस्कृत संभाषण ऐकून लोक उत्सुकतेने आमच्याशी बोलतात व आम्हाला असे बोलणे जमेल का, अशी विचारणाही करतात. या भाषेच्या वापराने व्यक्तिमत्वात फरक पडतो आणि लोकही आपल्याकडे आदराने बघतात, हा आमचा वैयक्तिक अनुभव आहे,’ असे मत त्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केले.
मालगे यांच्या मते अनेक लोकांना संस्कृत शिकण्याची आजही इच्छा आहे. अनेकजण दूरध्वनीवरून त्यासंबंधी विचारणा करतात व संस्कृत शिकू इच्छित असल्याचे सांगतात, असेही त्या म्हणाल्या.

संस्कृत भाषेचा उल्लेख आला की तिला चिकटलेल्या विविध संदर्भामुळे लगेच विवादांना सुरुवात होते. मात्र, आजही भारतात संस्कृत शिकू इच्छिणाऱ्यांची संख्या मोठी असल्याचे, ‘संस्कृत भारती’ या संघटनेने चालविलेल्या अभियानातून लक्षात आले आहे. त्यांनी राबविलेल्या ‘पत्राद्वारे संस्कृत शिक्षण’ या अभियानात सुमारे एक लाख लोकांनी नोंदणी केली आहे. नोंदणी केलेल्यांमध्ये देशभरातील विविध लोकांचा समावेश असला तरी संस्कृतचा सर्वाधिक विरोध ज्या राज्याने कधी काळी केला त्या तामिळनाडूमधील इच्छुकांची संख्या सर्वाधिक असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.