‘‘कर्ज बुडवणे ही शेतकऱ्यांची मानसिकता नाही. मात्र, त्याविषयी विपरीत चित्र निर्माण केले जात असून चुकीची धोरणे आखली जात आहेत. या चुकीच्या धोरणांमुळेच शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे,’’ असे मत खासदार आणि शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शुक्रवारी व्यक्त केले. भारतीय छात्र संसदेच्या दुसऱ्या दिवशी ‘शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि अर्थव्यवस्थेचा विकास’ या विषयावर ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर मध्यप्रदेश विधानसभेचे सभापती ईश्वरदास रोहानी, शेतकरी नेते पाशा पटेल, मनसेचे आमदार मंगेश सांगळे यांनीही आपले विचार व्यक्त केले. तिसऱ्या भारतीय छात्र संसदेच्या दुसऱ्या दिवशी इस्लामिक विचारवंत मौलाना सय्यद कालबे रशीद रिझ्वी, काश्मीर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. तलत अहमद, बिहार विधारसभेचे सभापती उदय नारायण चौधरी, जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, खासदार रवी शंकर प्रसाद, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे, यवतमाळचे आमदार नीलेश परवेकर, अभिनेत्री शबाना आझमी, दिग्दर्शक सुभाष घई, पंजाब विधानसभेचे सभापती डॉ. चरणजितसिंग अटवाल, ओस्मानिया विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. एस. सत्यनारायणन, राज्यसभा टीव्हीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुरदीप सिंग सप्पल, गांधीवादी नेते रामजी सिंग, उत्तरप्रदेशचे आमदार अ‍ॅड. नदीम जावेद या मान्यवरांनी विविध विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी देशभरातील विविध राज्यांतील तरूण आमदार आणि कार्यकर्त्यांना आदर्श युवा विधायक पुरस्कार देण्यात आला.
संघर्ष मिटवणे आणि शांतीचा शोध या विषयावर बोलताना रिझ्वी म्हणाले, ‘‘भारताची विविधता टिकवून ठेवण्यासाठी धर्मनिरपेक्षतावाद हेच एक साधन आहे. शांतता, विश्वास, समानता या तत्त्वांच्या बळावर जगापुढे आदर्श निर्माण करण्याची क्षमता भारतात आहे.’’ ‘राजकारणाचा तिरस्कार नको, त्यात सहभागी व्हा’ या विषयावर बोलताना ओमर अब्दुल्ला म्हणाले, ‘‘आंदोलन करणाऱ्या तरुणांनी मतदानासाठीही पुढाकार घेतला पाहिजे. कोणत्याही गोष्टीचा द्वेष करणे सोपे असते. मात्र, व्यवस्थेमध्ये सहभागी होऊन चांगले बदल घडवणे आवश्यक आहे. कोणत्या ना कोणत्या माध्यमातून राजकारणात सहभागी होण्याची संधी लोकशाहीमध्ये मिळते. राजकारण्यांनी व्यवस्थेचा, सत्तेचा गैरफायदा घेऊ नये, यासाठी त्यांच्यावर लोकशाही मार्गाने नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.’’ ‘भारतीय चित्रपटांमधील राजकारण’ या विषयावर बोलताना शबाना आझमी म्हणाल्या,‘‘लोकशाही बळकट करण्यासाठी आपण काय करतो, याचा समाजातील प्रत्येक घटकाने अंतर्मुख होऊन विचार करणे आवश्यक आहे. सध्या ‘मनोरंजन’ एवढेच धोरण चित्रपटांनी अंगीकारले आहे. मात्र, आता ‘मनोरंजन’ या संकल्पेचीच व्याख्या नव्याने करण्याची गरज आहे. आजपर्यंतचा इतिहास पाहिला तर बदल हा युवकांनीच घडवला आहे, हे लक्षात घ्यायला हवे.’’

शस्त्रसंधीसाठी प्रयत्न
काश्मीरमधील एका गावातील सरपंचाच्या हत्येबाबत ओमर अब्दुल्ला यांना विचारले असता त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, ‘‘दोन्ही देशांमध्ये पुन्हा शस्त्रसंधी व्हावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. शस्त्रसंधी मोडल्यामुळे सध्या सीमेवरील गावांमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. एकूण राज्यात आणि सीमेवरील गावात पुन्हा शांतता आणि सुरक्षितता निर्माण करण्यासाठी शस्त्रसंधी आवश्यक आहे.’’