केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात २५३ वा क्रमांक मिळवून उत्तीर्ण होणे याला उज्ज्वल यश म्हणायचे की आयुष्याच्या सुरुवातीला स्मशानात लाकडे रचणे, खड्डे खणणे अशी कामे करीत असतानाच शिकण्याचा ध्यास घेऊन पदवी प्राप्त करून मुंबई महापालिकेतच असिस्टंट सेक्रेटरी बनणे या प्रवासाला? उत्तर तसे सोपे नाही. परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही दोन्ही उदाहरणे एकाच घरातील आहेत. तीही पितापुत्रांची. खाडा मजूर म्हणून कारकिर्दीची सुरुवात करून असिस्टंट सेक्रेटरी पदापर्यंत पोहोचलेले अशोक आणि पहिल्याच प्रयत्नात केंद्रीय लोकसेवा आयोगाचे शिवधनुष्य पेलणारा त्यांचा मुलगा आमोद या नागपुरे पितापुत्रांची ही प्रेरणादायी कहाणी आहे.
अशोक नागपुरे यांचे संपूर्ण आयुष्यच संघर्षांत गेले. वडिलांची मिलची नोकरी गेल्यानंतर भाजी विकणाऱ्या आईच्या मिळकतीवर संपूर्ण घर चालायचे. त्यातून पाच बहिणी आणि एक भाऊ यांच्यासह खाणारी तोंडे नऊ. त्यामुळे शिकायचे तर अर्धवेळ नोकरी करून. नागपुरे यांनी गिरगावातल्या भटवाडीत नव्यानेच सुरू झालेल्या ‘संत मुक्ताबाई’ या पालिकेच्या रुग्णालयात खाडा वॉर्डबॉय म्हणून नोकरी धरली. कामाच्या आशेने तिन्ही पाळ्यांमध्ये जायचे आणि कामावर न येणाऱ्या वॉर्डबॉयच्या जागी काम करून पोटापुरते पैसे मिळवायचे. ही गोष्ट १९७८सालची. तीन वर्षे हे काम केल्यानंतर त्यांना १९८१ला कायम करण्यात आले. यावेळी त्यांचे काम होते स्मशानभूमीतील परिचारकाचे. सरण रचण्यासाठी लाकडे आणणे, रचणे, खड्डे खणणे, राख काढणे ही त्यांची कामे. नोकरी आणि शिक्षण एकाच वेळी चालू होते.
त्यानंतर काही वर्षांनी पदोन्नती मिळाली. त्यामुळे कामाचे स्वरूप थोडे बदलले. अंत्यसंस्काराशी संबंधित कायदेशीर कागदपत्रे तपासून घेऊन जमा करणे अशा प्रकारचे काम त्यांच्याकडे आले. या कामातून त्यांची सुटका झाली ती त्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर. पालिकेने भाषांतरकारांच्या भरतीसाठी घेतलेल्या परीक्षेत नागपुरे उत्तीर्ण झाले. त्यानंतर पदोन्नतीकरिता परीक्षा देत, त्यासाठी आवश्यक पदविका अभ्यासक्रम पूर्ण करीत ते पालिकेत असिस्टंट सेक्रेटरी पदापर्यंत पोहोचले. त्यामुळे, नागपुरे यांचा संघर्ष पालिकेतही कौतुकाचा विषय असतो.
वडिलांचा असा धगधगता आणि तेजोमय इतिहास असताना त्यांच्या या संघर्षमय जीवनाचा आदर्श त्यांच्या मुलाने घेऊ नये? ‘संघर्षवृत्तीच नव्हे तर वक्तृत्त्व, संघटन कौशल्य, लेखन, मनमळावू स्वभाव, मितभाषीपणा या गोष्टी देखील मी बाबांकडून घेतल्या.’ असे आमोद सांगतो. ‘त्यांचा खाडा मजूर ते अधिकारी पदापर्यंतचा प्रवास माझ्यासाठी सतत प्रेरणा देणारा ठरला. बाबांनी गॅस सिलेंडरही तीन-चार मजले चढून घरी पोहचविण्याचे काम केले आहे. ते त्यांचे जीवन जगत होते. हे करताना त्यांनी मला कधीही तात्त्विक डोस पाजले नाहीत. त्यांच्या जगण्यातून मी शिकत गेलो. त्यामुळे, माझे जे काही यश आहे, ते केवळ माझ्या बाबांमुळे,’ असे आमोद सांगतो.
आमोद यूपीएससीत २५३ क्रमांकावर असल्याने त्याची आयएएसची संधी थोडक्यात निसटली. त्यामुळे, तो पुन्हा एकदा २६ मे रोजी यूपीएससीला सामोरा जाणार आहे. जे पदरात पडलेय त्यावर समाधान न मानता आणखी मिळविण्यासाठी झटायचे हीच तर त्याच्या बाबांची आहे. आमोद ती कसा बरे विसरेल?