लहानथोर सगळ्यांनाच दिवाळीचे सगळ्यात मोठ्ठे आकर्षण असते. सुट्टीचे! फराळ, फटाके, नवीन कपडे, फिरायला जाणे या सगळ्या ‘मज्जा’ त्यानंतर येतात. परंतु समाजात असे अनेक अभागी असतात ज्यांना दिवाळीची सुट्टी मिळत नाही. तुमच्याआमच्या आनंदासाठी त्यांना स्वत:च्या आनंदावर पाणी सोडावे लागते. सीमेवर दक्ष असलेल्या जवानांची आठवण आपण ठेवतो. परंतु आपल्या शहरातही समाजाच्या आनंदासाठी कर्तव्यदक्ष राहणारी अनेक मंडळी असतात. अशाच काहींच्या दिवाळीची ही खबरबात!
उत्साहाचा झरा ‘वाहता’ राहावा म्हणून..
दिवाळीचा उत्साहाचा झरा ‘वाहता’ राहावा यासाठी सार्वजनिक वाहतूक विभागाचे कर्मचारी कामावर हजर असतात.  बेस्ट व एसटीचे ड्रायव्हर-कंडक्टर, उपनगरी रेल्वेचे मोटरमन-गार्ड आणि मेल-एक्स्प्रेसचे ड्रायव्हर-असिस्टंट ड्रायव्हर!  वीरेंद्रप्रसाद सिंग २५ वर्षे इंजिन ड्रायव्हर आहेत. सणासुदीला घरी जाणाऱ्यांच्या आनंदातच ते स्वत:चा सण साजरा करतात. ते म्हणतात, सीमेवरील सैनिकांची दिवाळीही अशीच साजरी होते ना. त्यांना तर सहासहा महिने घरी जाता येत नाही. आम्ही दिवाळीच नव्हे तर सर्व सण सहकाऱ्यांसोबत साजरा करतो. आमच्या ‘रनिंग रूम’मध्ये सगळ्या जाती-धर्माचे लोक एकत्र येऊन असेल तो सण साजरा करतो. दिवाळी -दसऱ्याला आम्ही आमचे इंजिन सजवतो, त्याला हारतुरे चढवतो. नारळ फोडतो. कोकण रेल्वेवर दसरा दिवाळीच नव्हे तर गणपती, होळीसारखे सणही आम्हाला अधिक आनंद देतात. आमचे प्रवासी हेच आमचे कुटुंब आहे, असे आम्ही मानतो. उपनगरी सेवेवर १८ वर्षे गार्ड असलेले महेंद्रपाल यांना मात्र अनेकदा घरच्यांसोबत सण साजरा करायची संधी मिळाली आहे. तीही त्यांच्या सहकाऱ्यांमुळे! आम्ही सर्व सहकारी एकमेकांना सांभाळून घेतो. कधी मी इतरांना सुट्टी घेऊन घरच्यांसोबत सण साजरा करायची संधी देतो तर कधी ते मला. अनेकदा गणपती किंवा दिवाळीसारख्या तीन-चार दिवसांच्या सणामध्ये आम्ही आमच्या कामाच्या पाळ्या अशा पद्धतीने लावून घेतो की आम्हाला एक दोन दिवस घरच्यांसोबत राहायला मिळते. सणाच्या वेळी ज्या स्थानकावर असतो तेथील विश्रांतीच्या खोलीमध्ये आम्ही उत्साहात सण साजरा करतो, असे त्यांनी सांगितले. रेल्वेपेक्षा बेस्टच्या ड्रायव्हर-कंडक्टरना वेगळा अनुभव मिळतो. कारण त्यांचा प्रवाशांशी थेट संपर्क असतो. वांद्रे डेपोमधील कंडक्टर दुर्योधन सावंत यांनी तर एका वर्षी मध्यरात्री भाऊबीज साजरी केली होती. दिवाळीत भावाने घरी यावे, असे माझ्याही बहिणीला वाटत होते. पण नोकरीवर जावेच लागले. त्या दिवशी बहिणीकडे जायला मिळते की नाही, ही चिंताच होती. गर्दी प्रचंड होती. लहान मुलांना घेऊन अनेकजण प्रवास करत होते. त्यात रात्रीचे ११ कधी वाजून गेले कळलेच नाही. मग मात्र धावतपळत बहिणीचे घर गाठले तेव्हा ती माझ्यासाठी जागीच होती, अशी आपली हृद्य आठवण सावंत यांनी सांगितली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिवाळीही ‘बंदोबस्तात’च!
दिवाळीचे आणि पोलिसांचे सहसा वैरच असते! दिवाळीच्या आधी पंतप्रधानांसह अनेक व्हीआयपीं मुंबईत येऊन गेले. त्यामुळे सलग तीन दिवस बंदोबस्तात गेले. या बंदोबस्तामुळे दिवाळीसाठी खरेदी आणि इतर तयारी करता आली नाही. दिवाळीत सुट्टी मिळत नाही. रजा रद्द होतात. कुटुंबप्रमुख घरात नसल्याने महिलाच दिवाळीची सगळी कामे उरकतात. गोवंडीच्या पालिका वसाहतीमधली पोलिसांची इमारत डबघाईला आली आहे. पण त्यामुळे घरात रंगरंगोटीही करता येत नसल्याची खंत येथील पोलिसांनी व्यक्त केली. आमचे बाबा दिवाळीला कधीच घरी नसतात. मग आम्ही  मुलेमुलेच एकत्र येऊन दिवाळी साजरी करतो, असे गोवंडीच्या पोलीस वसाहतीत राहणाऱ्या महेश बागलने सांगितले महिला पोलिसांना तर या पारंपारिक सणात घरी नसल्याची खंत खूपच जाणवते. त्यामुळे बऱ्याचजणी तयार फराळाचा पर्याय स्वीकारतात. मात्र, या नोकरीचा पर्यायसुद्धा आम्हीच स्वीकारला असल्याने तक्रार तरी काय करायची असे एका महिला पोलिसाने सांगितले. अशीच गत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचीही असते. माझी मुले दिवाळीसाठी आई वडिलांकडे गावी गेली. पण मला जाता आले नाही. माझी पत्नी घरी एकटीच तयारी करते. मी अवघे काही तास घरी दिवाळीसाठी असतो, अशी खंत परिमंडळ ५ चे उपायुक्त धनंजय कुलकर्णी यांनी बोलून दाखवली. तर यंदा लक्ष्मीपूजनाला घरी राहण्याचा योग जुळून येईल, असे वाटत नसल्याचे पोलीस अधीक्षक रश्मी करंदीकर यांनी सांगितले. पण कितीही व्यस्त असले तरी दिवाळीचे दोन तीन तरी पदार्थ मी घरी बनवते, असे त्यांनी आवर्जून सांगितले.  दिवाळीत सर्वानाच बोनस मिळतो. पण तो पोलिसांना मिळत नाही. त्यामुळे साठवलेल्या पैशांतून दिवाळी साजरी करावी लागते, अशी खंत अनेक पोलिसांनी बोलून दाखविली. आमच्या मैत्रिणी पारंपारिक वेषात नटून थटून कार्यालयांमध्ये जातात. पण आम्हाला मात्र गणवेशातच यावे लागते, असा हेवा एका महिला शिपायाने व्यक्त केला.
वेगळीच विवंचना..
दिवाळी साजरी होत असताना मुंबईतल्या शेकडो पोलिसांच्या डोक्यावर मात्र ऐन दिवाळीत घरे रिक्त करण्याची टांगती तलवार आहे. माहीम, आझाद मैदान, वर्सोवा, आरसीएफ कॉलनी आदी पोलीस वसाहतीतील शेकडो कुटुंबांना घरे सोडण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. ऐन दिवाळीच्या तोंडावर या नोटिसा आल्याने यंदा दिवाळीचा आनंद पार झोकाळून गेला आहे.

मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Feature on diwali diwali is also ours
First published on: 13-11-2012 at 05:13 IST