ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक मादी बिबटय़ाला जेरबंद करण्यात वन खात्याला आज पहाटे यश आले. आगरझरी गावाजवळ लावलेल्या पिंजऱ्यात ही मादी अलगद अडकली आणि गावकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. गेल्या १९ दिवसात वन खात्याने जेरबंद केलेला हा तिसरा बिबट आहे.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमधील गावांमध्ये नरभक्षक बिबटय़ाने अक्षरश: धुमाकूळ घातला होता. २४ मार्च ते १८ एप्रिल या २५ दिवसाच्या कालावधीत या नरभक्षीने आठ लोकांचा बळी घेतला तर एकाला जखमी केले. त्यामुळे गावकऱ्यांनी वन अधिकाऱ्यांवर तीव्र नाराजी व्यक्त करून बिबटय़ाला तातडीने बंद केले नाही तर आम्हीच ठार करू, असा धमकीवजा इशारा दिला होता. गावकऱ्यांचा हा इशारा लक्षात घेऊन वन खात्याने नरभक्षक बिबटय़ाला गोळय़ा घालण्याचे आदेश आले. तेव्हापासून वन व पोलिस खात्याचे सहा पथक नरभक्षीचा शोध घेत जंगल पिंजून काढत होते. कधी इरई धरणा लगत तर कधी आगरझरीच्या जंगलात बिबट दिसल्याची माहिती मिळताच पथकातील शूटर्स इकडून तिकडे पळत होते. मात्र सलग अकरा दिवस हा बिबटय़ा काही केल्या शॉर्प शूटरच्या डोळय़ांना दिसला नाही किंवा वन अधिकाऱ्यांनासुध्दा त्याने चकमा दिला.
दोन शार्प शूटर, एक पशुवैद्यकीय अधिकारी, बेशुद्धीकरणासाठी वन विभागाचे एक तज्ञ, स्थानिक अशासकीय संस्था ग्रामसभा असे पथक बिबटय़ाचा शोध घेत होते. त्यांना नेमून दिलेल्या गावात २४ तास गस्त लावण्यात आली होती. या व्यतिरिक्त पद्मापूर व मामला येथे जलद कृती दलाचे पथक तैनात करण्यात आले. दर तासाने बिबटय़ाच्या हालचालीची नियंत्रण कक्षाला माहिती देण्यासाठी म्हणून नियंत्रण कक्ष तयार करण्यात आला. या व्यतिरिक्त बिबटय़ाला जेरबंद करण्यासाठी वेगवेगळय़ा ठिकाणी दहा पिंजरे लावण्यात आले. प्रभावित क्षेत्रात गावकऱ्यांमध्ये वन्यप्राण्यांपासून सतर्कतेबाबत अशासकीय संस्था व स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने जनजागृती करण्यात आली. वरील सर्व उपाययोजना केल्यानंतर आज पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास ही मादी आगरझरी गावापासून पाचशे मीटर अंतरावर लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात अलगद अडकली.
आज सकाळी गावकऱ्यांना पिंजऱ्यात बिबट दिसताच त्यांनी याची माहिती वरिष्ठ वनाधिकाऱ्यांना दिली. माहिती मिळताच अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी बघितले असता पूर्ण वाढ झालेली नरभक्षी मादी बिबट पिंजऱ्यात अडकून पडल्याचे दिसून आले.  वन खात्याने गेल्या १९ दिवसात जेरबंद केलेला हा तिसरा बिबट असून पिंजऱ्यात अडकून पडलेल्यांची संख्या सहा झाली आहे. दोन दिवस या बिबटय़ाला निरीक्षणात ठेवण्यात येणार असून यानंतरच काय तो निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती वन खात्यातील सूत्रांनी दिली. ही मादी नरभक्षक असल्याचेही या सूत्राने सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Female leopard get trapped after lots of struggle
First published on: 30-04-2013 at 01:31 IST