शार्दूल क्रिएशन्स आणि आर. आर. ग्रूप यांच्यातर्फे मुंबईत २५ ते २७ मे या कालावधीत चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़ मंदिरात होणाऱ्या या महोत्सवात १२ चित्रपट दाखविण्यात येणार असून महोत्सवासाठी रसिकांना विनामूल्य प्रवेश आहे. पुढील महिन्यात २० ते २४ जून या कालावधीत मॉरिशस येथे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने मुंबईत हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
महोत्सवात टाइमपास, दुनियादारी, रेगे, आजचा दिवस माझा, सत ना गत, फॅण्ड्री, यलो, सामथ्र्य, ७२ मैल एक प्रवास, झपाटलेला-२, भाक रखाडी ७ किलोमीटर, प्रेम म्हणजे प्रेम असतं आदी चित्रपट दाखविले जाणार आहेत. यातून आठ चित्रपटांची निवड करण्यात येणार असून निवड झालेले चित्रपट मॉरिशस येथे होणाऱ्या महोत्सवात दाखविले जाणार आहेत. या वेळी चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार उपस्थित राहणार असून रसिकांनी या चित्रपट महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.