राष्ट्रीय औषधीय शिक्षण आणि संशोधन संस्थेसाठी (नायपर) हिंगण्यात सुचवण्यात आलेल्या दोन्ही जागांना तंत्रशिक्षण सहसंचालक कार्यालयाने नापसंती व्यक्त करीत ‘नायपर’ला वर्धा मार्गावर जागा मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
आयआयएम, ट्रीपल आयटी राष्ट्रीय पातळीवरील संस्थांच्या पाठोपाठ नायपरचे काम नागपुरात जोमाने सुरू असून त्यासंबंधीचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) येत्या आठवडाभरात मंजूर होण्याची शक्यता आहे. शैक्षणिकदृष्टय़ा नागपूरला शैक्षणिक हब ही उपाधी मिरवण्याइतपत नागपूरमध्ये राज्यस्तरीय आणि राष्ट्रीयस्तरीय संस्था आलेल्या आहेत तर काही येऊ घातल्या आहेत. त्यातील आयआयएमचे काम सुरू झाले आहे तर ट्रिपल आयटीला नुकतीच केंद्राची मंजुरी मिळाली आहे. संसद कायद्यांतर्गत देशात नायपर स्थापन केल्या जातात. केंद्र शासनाच्या रसायन आणि खते मंत्रालयाच्या औषधीय विभागांतर्गत ‘नायपर’चा कारभार चालतो. भारतीय व्यवस्थापन संस्था (आयआयएम) आणि अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेनंतर (एआयआयएमएस) नायपर तिसऱ्या क्रमांकाची महत्त्वाची संस्था समजली जाते. नायपर कायद्याची संकल्पना जेव्हा प्रचलित झाली तेव्हा त्याची एक शाखा नागपुरात स्थापन करण्याचे ठरले होते. मात्र तेव्हाच्या राजकीय इच्छाशक्तीअभावी नायपर पंजाबमधील मोहाली येथे हलवण्यात आले. त्यानंतर अहमदाबाद, बिहारमधील हाजीपूर, हैदराबाद, रायबरेली आणि गुवाहाटीमध्ये नायपर स्थापन झाले. मात्र, राज्य आणि केंद्रातील भाजप सरकारच्या समन्वयातून नायपरचा मार्ग मोकळा झाला असून विद्युत गतीने त्यावर काम सुरू आहे.
नायपरसाठी ५० ते १०० एकर जागा हवी असते. त्यासाठी तंत्रशिक्षण सहसंचालक कार्यालयाने जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव पाठवला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने त्यासाठी हिंगणा तालुक्यातील वायफळ आणि बोरगाव (वीर) या दोन ठिकाणच्या जागा सुचवल्या. मात्र, मुख्य रस्त्यापासून या जागा दूर असून बराच भाग जंगल आणि टेकडीने व्यापलेला असल्याने सहसंचालक कार्यालयाने पाहणी केल्यानंतर या दोन्ही जागांना नापसंती दर्शवून वर्धा मार्गावर जागा मिळावी, अशी अपेक्षा एका पत्राद्वारे व्यक्त केल्याचे सहसंचालक गुलाबराव ठाकरे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. यासंबंधी डीपीआरचे काम अमरावतीच्या शासकीय औषधीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही.के. मौर्य करीत आहेत. त्यानंतरच ते तंत्रशिक्षण संचालनालयाच्या मंजुरीसाठी पाठवले जाईल, असे
ठाकरे म्हणाले.

‘डीपीआर’मध्ये संपूर्ण तपशील
औधषनिर्माण उद्योगात मैलाचा दगड ठरणाऱ्या ‘नायपर’ला लागणारी जागा, पदांची संख्या, यंत्रसामुग्री आणि अभ्यासक्रमांचे विवरण डीपीआरमध्ये द्यायचे असते. पदव्युत्तरस्तरीय अभ्यासक्रम आणि संशोधनावर नायपरचा मुख्य भर असतो. सुमारे १०० एकर जागेवर नायपर असावी. सुरुवातीला सुमारे ६६ शिक्षकांची पदे अपेक्षित असतात तर उत्पादन, क्रिटिकल अ‍ॅनॅलिसिस किंवा हर्बल एक्सट्रॅक्ट काढण्यासाठी कोणती यंत्रेवजा उपकरणे लागतील, याची माहिती डीपीआरमध्ये येणे अपेक्षित असते. शिवाय नायपर ज्या भागात आहे त्या भागातील उद्योगांना वाव मिळेल, असे कोणते अभ्यासक्रम असावेत, याचाही ऊहापोह डीपीआरमध्ये असावा लागतो.