चंदगड विधानसभेची पोटनिवडणूक व पाठोपाठ येणारी लोकसभा निवडणूक या दोंन्ही निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा ध्वज फडकविण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज रहावे. केंद्रातील व राज्यातील काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीचे शासन निष्क्रिय असल्याने ते जनमानसातून उतरलेले आहे. या संधीचा लाभ घेऊन शिवसैनिकांनी या निवडणुकांमध्ये यश खेचून आणावे, असे आवाहन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी सोमवारी कोवाड येथे बोलतांना व्यक्त केले.    
कोवाड (ता.चंदगड) येथे सोमवारी चंदगड तालुका मध्यवर्ती विभागीय शिवसेना कार्यालय सुरू करण्यात आले. यानिमित्त शिवसैनिकांची व्यापक बैठकही आयोजित करण्यात आली होती. शाखेचे उद््घाटन केल्यानंतर देवणे शिवसैनिकांना मार्गदर्शन करीत होते. अध्यक्षस्थानी चंदगड शिवसेनेचे संपर्क प्रमुख सुनील शिंदे होते.
देवणे म्हणाले,‘‘ शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आपल्यात आता नसले तरी त्यांनी दिलेली वैचारिक शिदोरी आपल्यासोबत आहे. सेनाप्रमुखांचा विचार घेऊन जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी शिवसेना कार्यरत राहणार आहे. त्यासाठी सध्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेने संपर्क अभियान सुरू केले असून त्याला ग्रामीण भागांतील नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे. सामान्य जनतेत शिवसेनेविषयी सहानुभूती असल्याने त्यांचे व शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शिवसैनिकांनी कार्यरत राहावे. आगामी लोकसभा निवडणुकीत यश मिळविण्याच्यादृष्टीने आत्तापासूनच गावागावात जाऊन शिवसैनिकांनी जनतेशी सुसंवाद ठेवावा, असे आवाहन त्यांनी केले.
या वेळी सुनील शिंदे, उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, चंदगड तालुका प्रमुख डॉ.संजय पाटील, तालुकाप्रमुख महादेव गावडे, महिला आघाडी प्रमुख शांता जाधव आदींची भाषणे झाली. या वेळी शिवसैनिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.