दहा कोटी रुपयांचे कर्ज मिळून देण्यासाठी ३५ लाख रुपये घेऊन एका व्यावसायिकाची फसवणूक केल्याप्रकरणी मंगळवारी ठाणेनगर पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा पोलीस शोध घेत आहेत.  अनिल भाऊराव पाटील (३५, रा. जळगाव), जतीन भरत शहा (५५, रा. कांदिवली), रितेश गुप्ता आणि संदीप सिंग अशी चौघांची नावे आहेत. ठाण्यात राहणारे प्रवीण बच्छाव यांची खारकर आळीमध्ये मे. आकार जिओमेट्रिक्स प्रा. लि नावाची कंपनी आहे. आरोपी अनिल पाटील हा त्यांचा लहानपणीचा मित्र आहे. अनिल, जतीन, रितेश आणि संदीप या चौघांनी प्रवीण यांना कंपनीसाठी दहा कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करून देतो, असे आमिष दाखविले व त्यासाठी त्यांच्याकडून सुमारे ३५ लाख रुपये घेऊन त्यांना खोटे प्रमाणपत्र दिले. ऑगस्ट २०१० मध्ये हा प्रकार घडला असून दोन वर्षांनंतर आपली फसवणूक झाल्याचे प्रवीण यांच्या लक्षात आले. त्यानुसार, त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.