महात्मा फुले जयंतीनिमित्त डॉ. पंजाबराव देशपांडे सभागृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनीअर्स (बानाई) नागपूतर्फे अभिवादन स्पर्धेचे पारितोषिक वितरण व संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले. यंदा निबंध स्पर्धेत सर्व पारितोषिक मुलींनी पटाकवले.
कार्यक्रमाचे मुख्य अतिथी व उद्घाटक डॉ. हर्षदीप कांबळे, मार्गदर्शक डॉ. हेमंत तिरपुडे व डॉ. प्रदीप आगलावे होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सुनील तलवारे होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याकरिता प्रश्नोत्तरी परीक्षा घेण्यात आली होती व २६ नोव्हेंबर २०१४ ला संविधान दिनी ‘भारतीय संविधानावर’ निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली. यात राज्यातील सर्व सहाही महसूल विभागातील २२ जिल्हांमधून ९४६७ विद्यार्थ्यांनी भाग घेतला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ८ पुस्तकांवर प्रश्नोत्तरी परीक्षा घेण्यात आली होती. स्पर्धेकरिता १८ वर्षांपर्यंत विद्यार्थ्यांकरिता ‘अ’ वर्गगट व १९ ते २५ वर्षांपर्यंत ‘ब’ वर्गगट निर्धारित करण्यात आले होते. यामधील ‘अ’ वर्गगटामधील २५ हजार रुपयांचे पहिल पारितोषिक मुलांमधून नागपूरच्या कुर्वेज न्यू मॉडेल सीताबर्डी या शाळेचा प्रसेनजीत बावनगडे व मुलींमधून २५ हजार रुपयांचे पहिले पारितोषिक लक्ष्मीबाई वानखेडे हायस्कूल हिंगणा या शाळेची कुमारी मिनल दिलीप कोपरे हिला देण्यात आले. तसेच ‘ब’ गटातून सुद्धा २५ हजार रुपयांचे पहिले पारितोषिक मुलांमधून विद्याभारती विद्यालय कारंजा लाड, वाशिम या कॉलेजचा नितीन इंगोले याला आणि २५ हजार रुपयांचे पहिले पारितोषिक मुलींमधून लोकनायक विद्यालय, यवतमाळ या कॉलेजची गौतमी थुल हिला प्राप्त झाले. तसे निबंध स्पर्धेचे पारितोषिक ‘अ’ गटामधून हडस हायस्कूलची प्रियंका खोब्रागडे हिला आणि ब गटामधून अणे महाविद्यालय, यवतमाळमधील योगीता सूर्यवंशी हिला मिळाले. याशिवाय २५ हजार रुपयांची प्रोत्साहनपर ४२ पारितोषिके वितरित करण्यात आली. संचालन अंकिता लोखडे यांनी केले. आभार परीक्षेचे मुख्य आयोजक जयंत इंगळे यांनी मानले.