आठवडय़ाचा पहिला दिवस. दाट लग्नतिथी. उन्हाळ्याच्या सुटय़ा. यामुळे रेल्वेगाडय़ांना तुम्डुंब गर्दी उसळलेली असताना सोमवारी सकाळी ८.३५ च्या सुमारास मनमाड रेल्वे स्थानकातुन मनमाड-कुर्ला गोदावरी सुपरफास्ट एक्स्प्रेस निघाली खरी, मात्र, अवघ्या काही अंतरावर रेल्वेच्या महादेव बंधाऱ्याजवळ या गाडीचे इंजिन निकामी झाले. परिणामी, दुसरे इंजिन लावून ही गाडी पुन्हा माघारी आणण्यात आली. त्यामुळे गाडीला दीड तास विलंब झाला. रेल्वेगाडीतील प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त करत रेल्वे प्रशासनाला धारेवर धरले. दीड तास विलंबाने सकाळी दहा वाजता या गाडीने नाशिककडे प्रयाण केले.
सकाळी आपल्या नियोजित वेळेनुसार फलाट क्रमांक चारवरून गोदावरी एक्स्प्रेस निघाली होती. पण, काही अंतर पुढे गेल्यानंतर गाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाला. त्यामुळे गाडी जागच्या जागी थांबली. त्यामुळे तातडीने दुसऱ्या इंजिनची व्यवस्था करून गाडी पुन्हा माघारी फलाट क्रमांक चारवर आणण्यात आली. रेल्वे अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. दुसऱ्या इंजिनची तातडीने व्यवस्था करण्यात आली. हे इंजिन गोदावरी एक्स्प्रेसला लावण्यात आले. परंतु, तोपर्यंत भुसावळकडून मुंबईला जाणाऱ्या काही सुपर फास्ट गाडय़ांची वेळ झाली होती. त्यामुळे या गाडय़ा पुढे मार्गस्थ करण्यात आल्या. त्यानंतर तब्बल दीड तास उशिराने गोदावरी एक्स्प्रेसने नाशिकच्या दिशेने प्रयाण केले. सध्या दाट लग्नतिथी, व उन्हाळ्याच्या सुट्टय़ांमुळे गाडय़ांना प्रचंड गर्दी आहे. त्यात सोमवारी शासकीय सुटी होती. शिवाय, पोर्णिमा असल्याने रविवारी रात्री हजारोंच्या संख्येने मुंबई व उपनगरातुन शिख भाविक दर्शनासाठी मनमाड गुरुद्वारात आले होते. ते गोदावरी एक्स्प्रेसने जात असल्याने या भाविकांची गर्दी होती. ऐन गर्दीच्या वेळी इंजिन नादुरुस्त झाल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला. गाडीला विलंब होत असल्याने काही प्रवाशांनी परतीचा मार्ग स्वीकारला.