राजकीय जीवनात अनेक संकटे आली, परिस्थिती विपरीत झाल्यानंतर काय करावे, असा संभ्रम मनात आला. पण परिणामांची चिंता न करता संघर्ष करत राहिल्याने इथपर्यंत पोहचलो. सर्वसामान्य माणसातील प्रेम, सद्भावना हीच आपली शक्ती आहे. भविष्यात आपल्याकडून प्रेरणा घेऊन काम उभे राहील, असे मत खासदार गोपीनाथ मुंडे यांनी व्यक्त केले.
 बीड येथे खासदार गोपीनाथ मुंडे यांचा वाढदिवस विविध संघटनांनी साजरा केला. या निमित्ताने आयोजित भाजप जिल्हा कार्यालयाच्या समोर सत्कारानंतर खासदार मुंडे म्हणाले, आपण वाढदिवस साजरा करत नाही. स्व. विलासराव देशमुख व इतर मित्रांच्या आग्रहामुळे एकसष्टी जाहीरपणे साजरी केली होती. मात्र, यावेळी सर्वसामान्य जनतेला भेटता यावे, म्हणून जिल्हय़ात आल्याचे त्यांनी सांगितले. परळी जन्मभूमी तर बीड ही कर्मभूमी आहे. आपली शक्ती काय, असे अनेकदा विचारले जाते. विरोधकांना ते सापडत नाही. ४० वषार्ंच्या सार्वजनिक जीवनात आपण जनतेच्या मनात निर्माण केलेले प्रेम हीच आपली शक्ती आहे. प्रेम हे विकत घेता येत नाही. सद्भावनाही बाजारात मिळत नाही. ती कार्यातून निर्माण होते. नेल्सन मंडेला यांनी महात्मा गांधी यांच्याकडून प्रेरणा घेऊन केलेल्या कामाची जगाने दखल घेतली. त्यांच्या श्रद्धांजलीसाठी जगातील अध्यक्ष उपस्थित होते. माणसांपेक्षा त्यांचे काम मोठे असते. आपल्या कामातून प्रेरणा घेऊन काम उभे राहिले पाहिजे. भविष्यात असेच काम करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.
६४ वषार्ंच्या जीवनातील अनुभवाची शिदोरी खूप मोठी आहे. त्यामुळे सर्वच डाव मी कोणाला शिकवत नाही. भविष्यात आता एक एक डाव विरोधकांना दिसेल, असा टोलाही त्यांनी लगावला. तर प्रेमाचे कर्ज फेडायचे नसते, बँकांचे कर्ज मात्र फेडायचे असते, असा चिमटाही त्यांनी काढला. यावेळी आमदार पंकजा पालवे, प्रज्ञा मुंडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकत्रे मोठय़ा संख्येने उपस्थित होते.