आघाडी सरकारने शेतकऱ-यांना देशोधडीला लावले असून हे सरकार पुन्हा सत्तेवर आल्यास ग्रामीण अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून जाईल. त्यामुळे देश व राज्याच्या हितासाठी सत्तापरिवर्तनासाठी सज्जतेचे आवाहन आमदार विजय औटी यांनी केले.
तालुक्यातील कामोठे येथे पारनेरकरांच्या वतीने कामोठे व नवी मुंबई येथील शिवसैनिकांच्या स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी औटी बोलत होते. अध्यक्षस्थानी कोरठण खंडोबा देवस्थानचे अध्यक्ष पांडुरंग गायकवाड होते. सभापती सुदाम पवार, कामगारसेनेचे सरचिटणीस अनिकेत औटी, उपसभापती अरुणा बेलकर, माजी सभापती गंगाराम बेलकर, अशोक कटारिया, शिवसेनेचे रायगड जिल्हाप्रमुख बबन पवार या वेळी उपस्थित होते.  
औटी म्हणाले, राज्यात विजेची गरज व उपलब्धता यामध्ये पाच हजार मेगावॉटची तूट असल्याने ग्रामीण भागात विजेच्या भारनियमनाचा मोठा फटका बसत आहे. याचा विपरीत परिणाम शेती व्यवसायावर होत आहे. सन २०१२पर्यंत राज्य भारनियमनमुक्त करण्याचे सरकारचे आश्वासन फोल ठरले आहे. हे सरकार पुन्हा सत्तेवर आल्यास विजेचा प्रश्न आणखी गंभीर होणार आहे. यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था पूर्ण कोलमडून जाऊन स्थलांतराचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. सध्या देशात परिवर्तनाची मोठी लाट निर्माण झाली आहे. ग्रामीण जनतेनेही देश व राज्याचे हित लक्षात घेऊन परिवर्तनात सामील होणे गरजेचे आहे.
युती सरकारच्या साडेचार वर्षांच्या सत्तेच्या कालावधीत सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न झाला. या काळात जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थिर होते. मात्र आघाडी सरकारच्या काळात जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढल्याने सर्वसामान्य जनतेला जगणे मुश्कील झाले आहे. भ्रष्टाचार झाकण्यासाठीच या सरकारने मंत्रालयाला आग लावली असून हे सरकार पुन्हा सत्तेवर आल्यास ते महाराष्ट्राला आग लावतील असा आरोप त्यांनी केला.  
शिवसेनेचे तालुकाप्रमुख नीलेश लंके, पंचायत समिती सदस्य गणेश शेळके, आर. आऱ  गायकवाड, संगीता खोडदे, माजी सदस्य विकास रोहोकले, निवत्ती गाडगे, रामदास भोसले, साहेबराव वाफारे आदी या वेळी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Government of lead ruined farmers
First published on: 11-02-2014 at 03:20 IST