महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेच्या अंमलबजावणीत पोलीस, महसूल, विधी व इतर शासकीय विभागांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे योगदान महत्वपूर्ण आहे. यामुळे शासनाने मोहिमेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना सन्मानित करण्याची संकल्पना मांडली. उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सन्मानपत्र दिले जाते.
मोहिमेतील उत्कृष्ट कामगिरीचे मूल्यमापन करून संबंधितांना गौरविण्यासाठी शासनाने महसूली विभाग, पोलीस परीक्षेत्र, जिल्हा, तालुका, पोलीस ठाणे व गाव पातळी या सर्वाचा साकल्याने विचार केल्याचे दिसून येते. मोहिमेच्या अंमलबजावणीच्या वर्षांत तंटामुक्त गावांची टक्केवारी इतर विभागांपेक्षा अधिक असणाऱ्या विभागाच्या आयुक्तांना त्यांच्या कार्याबद्दल सन्मानपत्र प्रदान केले जाते. राज्यातील सातपैकी ज्या पोलीस परिक्षेत्रात या मोहिमेची सवरेत्कृष्ट अंमलबजावणी होईल, अशा पोलीस परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनाही त्याच पद्धतीने गौरविले जाते. महसुली विभागातील ज्या जिल्ह्याने चांगली कामगिरी केली, तेथील जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना सन्मानपत्र दिले जाते. प्रत्येक जिल्ह्यातून ज्या तालुक्याची उर्वरित तालुक्यांच्या तुलनेत सरस कामगिरी असेल, तेथील तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांचा सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येते. या मोहिमेची खरी धुरा स्थानिक पातळीवर पोलीस ठाणे सांभाळत असते. ही बाब लक्षात घेऊन प्रत्येक जिल्ह्यातील ज्या पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात सवरेत्कृष्ट अंमलबजावणी केली जाते, अशा पोलीस ठाण्याच्या प्रमुखास सन्मानपत्र प्रदान केले जाते. या मोहिमेत गाव पातळीवरील घटक सक्रियपणे कार्यरत असतो. त्यांच्या कार्याची दखलही घेण्यात आली आहे. जिल्ह्यातील गुणानुक्रमे प्रथम येणाऱ्या तंटामुक्त गावातील बीट हवालदार, गाव कामगार तलाठी व ग्रामसेवक अथवा ग्राम विकास अधिकारी यांना सन्मानपत्र प्रदान केले जाते. ही निवड करण्यासाठी शासनाने खास समिती गठीत केली आहे.
या मोहिमेत तंटामुक्त गाव व प्रसिद्धीसाठी आर्थिक स्वरूपात पुरस्कार दिले जातात. परंतु, शासकीय यंत्रणेला केवळ सन्मानपत्रावर समाधान मानावे लागते. या निकषात त्या अनुषंगाने बदल करावेत, अशी शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची भावना आहे.
ग्रामीण भागात शांततेचे वातावरण निर्माण करण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान राबविले जात आहे. या मोहिमेचे यंदा सातवे वर्ष. या माध्यमातून स्थानिक पातळीवरील तंटे सामोपचाराने मिटविणे आणि विविध स्वरूपाचे उपक्रम राबवून ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देण्याचा प्रयत्न होत आहे. या मोहिमेच्या नाशिक विभागातील कामगिरीचा वेध मालिकेद्वारे घेण्यात येत आहे. मालिकेतील एकोणीसावा लेख.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Government officials deserves financial help with esteem certificate
First published on: 21-12-2013 at 01:18 IST