संकल्प सेवा समिती गोळेवाडी, आरोग्य साधना हेल्थ सेंटर यांच्यातर्फे महारक्तदान शिबीर घेण्यात येणार आहे. समितीच्या या उपक्रमाला १२ वर्षे झाल्याने या वर्षी थॅलेसेमियाच्या रुग्णांसाठी वर्षभराची रक्ताची बेगमी करता यावी, हा यामागचा उद्देश आहे. तसेच या रुग्णांना दत्तक घेण्याचा समितीचा मानस असल्याचे आशीष गोळे यांनी सांगितले. शिबिराला के.ई.एम रुग्णालय आणि अर्पण रक्तपेढी सहकार्य करणार आहे.
शहरातील सुमारे १५ मुलांना थॅलेसेमिया झाला आहे. ही मुले तीन ते १२ या वयोगटातील आहेत. या दुर्धर आजारामुळे या रुग्णांना दर महिन्याला किंवा महिन्यातून दोनदा रक्त द्यावे लागते. त्यासाठी त्यांना केईएम रुग्णालय किंवा घाटकोपर येथील समर्पण रक्तपेढीत जावे लागते. संबंधित ठिकाणी रक्त उपलब्ध नसल्यास विकतचे रक्त घेऊन त्यांना द्यावे लागते. कल्याणमधील अर्पण रक्तपेढीच्या माध्यमातून या रुग्णांना रक्त पुरविले जाणार आहे. उल्हासनगरच्या सरकारी रुग्णालयात या रुग्णांना रक्त देण्याचे काम सुलभ होईल. वर्षांला साधरणत: २०० ते २५० रक्ताच्या पिशव्या लागतात. दोन वर्षांत बदलापूर ग्रामीण रुग्णालयात थॅलेसेमियाच्या रुग्णांसाठी सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी स्थानिक आमदार किसन कथोरे यांच्याकडे पाठपुरावा केला आहे. रविवार १८ जानेवारीला सकाळी ९ ते ३ या वेळेत काका गोळे फाऊंडेशन, अखिल इमारत, तलाठी कार्यालयाजवळ (पूर्व) हे शिबीर होणार आहे.
समीर पारखी, बदलापूर

रक्तदान
’कुठे – काका गोळे फाऊंडेशन (पूर्व)
’कधी- रविवार, १८ जानेवारी
’वेळ – सकाळी ९ ते दुपारी ३