नगर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार येत्या दोन दिवसांत जाहीर करू, असे पक्षाचे अध्यक्ष तथा केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी सोमवारी मुंबईत स्पष्ट केले. दरम्यान, माजी आमदार राजीव राजळे व माजी मंत्री बबनराव पाचपुते या दोन्ही प्रमुख इच्छुकांशीही त्यांनी या वेळी संवाद साधला. पाचपुते यांनीही नकारघंटा बंद करून ही निवडणूक लढवण्याची तयारी आता दर्शवली असली तरी पवार यांनी मात्र राजळे यांना हिरवा कंदील दिल्याचे खात्रीलायकरीत्या समजते. अन्य इच्छुकांनी मात्र रिंगणातून माघार घेतल्याचे समजते.
नगर लोकसभा मतदारसंघातील पक्षाच्या उमेदवारीबाबत जिल्हय़ातील प्रमुख नेत्यांची बैठक सोमवारी मुंबईत बोलावण्यात आली होती. पवार यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे सभापती दिलीप वळसे, गृहमंत्री आर. आर. पाटील, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भास्करराव जाधव, कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड, जिल्हय़ाचे पालकमंत्री मधुकर पिचड यांच्यासह ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख, आमदार बबनराव पाचपुते, माजी खासदार प्रसाद तनपुरे, आमदार चंद्रशेखर घुले, माजी आमदार नरेंद्र घुले, आमदार शंकरराव गडाख, नगरचे महापौर संग्राम जगताप, माजी आमदार पांडुरंग अभंग, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, दादा कळमकर, राजेंद्र फाळके, राजेंद्र कोठारी, सुजित झावरे बैठकीला उपस्थित होते.
मिळालेल्या माहितीनुसार बैठकीत सुरुवातीलाच घनश्याम शेलार यांनी इच्छुकांची नावे सांगताना त्यातून आता आपल्याला आता वगळावे अशी विनंती केली. लोकसभेसाठी आपण इच्छुक नाही हे त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर माजी खासदार प्रसाद तनपुरे व माजी आमदार दादा कळमकर यांनीही असाच सूर लावल्याने इच्छुकांच्या रिंगणात आता राजळे व पाचपुते असे दोघेच राहिले आहेत. ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी याआधीच ही गोष्ट स्पष्ट करतानाच राजळे यांच्या उमेदवारीला पाठिंबाही जाहीर केला आहे.
बाळासाहेब जगताप यांनी बैठकीत पाचपुते यांच्या उमेदवारीची मागणी करताना तेही आता त्यासाठी तयार असल्याचे स्पष्ट केले. चर्चेअंती येत्या दोन दिवसांत याबाबतचा निर्णय जाहीर करू असे सांगून पवार यांनी उमेदवारीची अस्वस्थता कायम ठेवल्याचे दिसत असले तरी राजळे यांना मात्र त्यांनी झुकते माप दिल्याचे समजते. तसे स्पष्ट संकेतही त्यांनी आजच राजळे यांच्यासह अन्य प्रमुखांना दिल्याचे समजते. दरम्यान, पवार यांनीच राजळे यांच्या कार्यपद्धतीबाबत नापसंती व्यक्त केल्याचे समजते. त्यावर या चुका मान्य करून यापुढे पक्षबाहय़ व्यासपीठ किंवा अशा चुका होणार नाही असेही त्यांनी या वेळी सांगितले. याआधी असे का करावे लागले हेही त्यांनी या वेळी स्पष्ट केल्यानंतर यावर पवार यांनी पडदा टाकल्याचे समजते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Green signal to rajale for lok sabha
First published on: 04-02-2014 at 03:00 IST