माधुरी दीक्षित भारतात कायमची परतल्यानंतर झळकणारा तिचा पहिला चित्रपट ‘गुलाब गँग’ असून त्यामध्ये तिची पूर्वीची स्पर्धक अभिनेत्री जुही चावला हीसुद्धा प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. सर्व स्त्री पात्रे प्रमुख असलेला हा चित्रपट उत्तर प्रदेशच्या बुंदेलखंडमधील संपत पाल देवी यांनी सुरू केलेल्या गुलाबी गँगवर बेतलेला किंवा संपत पाल यांच्या आयुष्यावरचा चरित्रपट नाही, असे निर्माता अनुभव सिन्हा यांनी स्पष्ट केले आहे.
‘गुलाब गँग’ हा निर्माता म्हणून आपला पहिला चित्रपट असून कोणाच्याही आयुष्यावर बेतलेला नव्हे तर हा चित्रपट पूर्णपणे काल्पनिक आहे. संपत पाल यांनी स्थापन केलेल्या गुलाबी गँगप्रमाणेच आपल्या चित्रपटातील स्त्री व्यक्तिरेखांनी गुलाब रंगाचा पेहराव केला आहे एवढेच साम्य आहे, असेही सिन्हा यांनी सांगितले.
‘रा.वन’ चित्रपटाच्या दिग्दर्शनानंतर आपण प्रथमच निर्मिती क्षेत्रात उतरत असून सर्व प्रमुख व्यक्तिरेखा महिलांच्या असल्यानेच ‘गुलाब गँग’ हा सिनेमा करणे आपल्यासाठी सोपे कधीच नव्हते, त्याचबरोबर चित्रपटाचा विषय खूपच वेगळा असल्याने निर्मितीसाठी आवश्यक असलेले पैसे गोळा करताना बरेच कष्ट पडले. जुही चावला, माधुरी दीक्षित यांनी आतापर्यंत साकारलेल्या भूमिकांपेक्षा पूर्णपणे वेगळी भूमिका असल्यामुळेच त्यांनीही चित्रपटासाठी होकार दिला. त्यामुळे कष्ट पडले तरी चित्रपट निर्मिती करण्याचा आपला हा पहिला अनुभव खूपच छान होता असेही अनुभव सिन्हा म्हणाले.
चित्रपटाची निर्मिती करणे हे आपले स्वप्न या चित्रपटामुळे पूर्ण होत असून त्यासाठी ‘बनारस मीडिया वर्क्स’ ही कंपनी आपण स्थापन केली आहे. अनेक चांगल्या पटकथा असूनही त्यावर चित्रपट करण्यासाठी आपल्याकडे वित्त सहाय्य मिळत नाही. म्हणूनच निर्माता बनण्याचे ५-६ वर्षांपूर्वी ठरविले होते, असेही सिन्हा यांनी आवर्जून नमूद केले.
‘रा.वन’ चित्रपट बनविण्यासाठी माझ्या आयुष्याची जवळपास ४-५ वर्षे खर्ची पडली. त्यामुळे त्यातून मानसिकरित्या बाहेर पडल्यानंतरच आपण निर्मितीकडे वळलो असून ‘गुलाब गँग’चे दिग्दर्शन सौमिक सेन करीत असून त्याशिवाय ‘जिद्द’, ‘वॉर्निग’ या चित्रपटांवरही आपण सध्या काम करीत असल्याची माहिती सिन्हा यांनी दिली.