नेरुळ येथील डॉ. डी. वाय. पाटील क्रीडासंकुलात डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य जनजागृती महाशिबिरासाठी शुक्रवारी सकाळी अचानक नवी मुंबईत दीड हजारपेक्षा जास्त बस गाडय़ा आणि एक हजार खासगी वाहने घुसल्याने सायन-पनवेल महामार्गावर मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात वाहने येणार असल्याबाबत वाहतूक विभागास कोणतीही पूर्वसूचना न दिल्याने शहरातील बहुतेक सर्व अंतर्गत रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली. त्यातही पामबीच, वाशी, ठाणे-बेलापूर मार्गावर अभूतपूर्व कोंडी झाली. अचानक झालेल्या या कोंडीवर नियंत्रण मिळविण्यासाठी वाहतूक विभागाचे उपायुक्त विजय पाटील यांना अखेर रस्त्यावर उतरावे लागले.
रायगड जिल्ह्य़ातील रेवदंडा येथील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या वतीने नेरुळ येथील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये दीड लाख रुग्णांच्या आरोग्य तपासणीसाठी महाशिबीर आयोजित करण्यात आले होते. सकाळी सात ते संध्याकाळी पाच या वेळेत पार पडलेल्या या महाशिबिरासाठी दीड हजार डॉक्टर आणि पाच हजार स्वयंसेवक तैनात करण्यात आले होते. मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि पुणे येथून रुग्णांना आणण्यासाठी एक हजारहून अधिक बस गाडय़ांची व्यवस्था करण्यात आली होती. यासंदर्भात नवी मुंबई वाहतूक विभागाशी चर्चा करणे आवश्यक होते, पण अशा प्रकारची कोणतीही चर्चा न करता प्रतिष्ठानने एवढय़ा मोठय़ा महाशिबिराचे आयोजन केल्याचे उपायुक्त विजय पाटील यांनी सांगितले. अचानक शहरात घुसलेल्या एक हजारपेक्षा जास्त बस गाडय़ा, सामानाचे ट्रक, डॉक्टरांची वाहने, पाच हजारहून जास्त स्वयंसेवकांची खासगी वाहने नेरुळमध्ये आल्याने सकाळपासून वाहतूक कोंडीला सुरुवात झाली. त्यामुळे सर्वप्रथम सायन-पनवेल महामार्गावर कोंडी झाल्याने त्याचे परिणाम ठाणे-बेलापूर महामार्ग आणि पामबीच व जेएनपीटी मार्गावर जाणवले. सायन-पनवेल महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने ही कोंडी दुपारनंतर अधिक वाढली. इतकी वाहने येतील याचा कोणताही अंदाज नसलेल्या वाहतूक विभागाने अगोदर कमी बंदोबस्त ठेवला होता. तो नंतर वाढवावा लागला. पाटील यांनी स्वत: सीबीडी उरण फाटय़ाजवळील कोंडी सांभाळली. दुपारी तीननंतर वाहने परतीच्या मार्गावर लागल्यानंतर ही कोंडी काही वेळाने फुटली.