मेळघाटातील आरोग्य सेवेच्या दर्जाविषयी सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असतानाच जिल्हा मुख्यालयी असलेल्या सरकारी रुग्णालयांमध्ये देखील रुग्णांचे प्रचंड हाल सुरू असून सोनोग्राफी, इसीजी, क्ष-किरण, सिटीस्कॅन यासारख्या सुविधा बंद आहेत. तज्ज्ञ डॉक्टरांअभावी आरोग्य सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे, असा आरोप करून मेळघाटातील स्वयंसेवी संघटनांनी येत्या गुरुवारी,  ७ फेब्रुवारीला येथील इर्विन चौकात निदर्शने करण्याचा निर्णय घेतला आहे. विविध संघटनांचे कार्यकर्ते यावेळी जिल्हा शल्यचिकित्सकांची भेट घेणार आहेत.
मेळघाटात प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये आणि उपजिल्हा रुग्णालयातून आरोग्यसेवा पुरवली जाते. ही सेवा रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी अनेकदा उपयोगी पडत नाही. या ठिकाणी सोयी, सुविधा नसल्याने बरेच वेळा रुग्णांना अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय, सुपर स्पेशालिटी अशा रुग्णालयांमध्ये हलवण्याचा सल्ला दिला जातो. गरीब आणि सर्वसामान्यांना खाजगी आरोग्यसेवा न परवडणारी झाली असल्याने सरकारी रुग्णालयांखेरीज त्यांना पर्याय नाही. अशात या रुग्णांना अमरावतीत आणताना रुग्णवाहिका उपलब्ध नसते. रुग्ण कसाबसा जिल्हा मुख्यालयी असलेल्या सरकारी रुग्णालयांमध्ये पोहोचतो, पण या रुग्णालयांमध्ये सोनोग्राफी, इसीजी, सिटीस्कॅन, क्ष-किरण, व्हेंटिलेटर यासारख्या सुविधा उपलब्ध नसल्याचे दिसून आले आहे. या दवाखान्यांमध्ये प्रसूतीतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ नाही. सोनोलॉजिस्ट, रेडिओलॉजिस्ट यांच्या सेवा उपलब्ध नाहीत. रक्तपेढीत रक्त नाही. मेल्यानंतर शववाहिनी देखील मिळत नाही. सर्वसामान्यांनी जावे कुठे, असा सवाल या स्वयंसेवी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे.
राज्य घटनेने नागरिकांना जगण्याचा अधिकार बहाल केला आहे, पण सरकारी रुग्णालयांमधील परिस्थिती पाहता, हा अधिकारच हिरावून घेतला
जात असल्याचे चित्र दिसते. जिल्ह्य़ातील लोकप्रतिनिधींना आरोग्यसेवेतील या उणिवांविषयी माहिती आहे, पण त्यावर कुणीही बोलायला तयार नाही. खाजगी आरोग्यसेवा गरिबांनाच नव्हे, आता तर श्रीमंतांसाठीही न परवडणारी झाली आहे, तर गरीब आदिवासींच्या जगण्याचा विचार कुणी करणार आहे का, चांगल्या आरोग्य सेवा पुरवण्याची जबाबदारी कुणी घेणार आहे का, असे प्रश्न मेळघाटातील स्वयंसेवी संघटनांनी मांडले आहेत. या विषयावर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ७ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता इर्विन चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ एकत्र येऊन जिल्हा शल्यचिकित्सकांना जाब विचारण्याचे या कार्यकर्त्यांनी ठरवले आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन अॅड. जोस, महादेव चिलाटे, बंडय़ा साने, दशरथ बावनकर आदींनी केले आहे.