विदर्भात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने शेतक ऱ्यांना दिलासा मिळाला आहे. टप्प्या टप्प्यात होत असलेला पाऊस पिकांसाठी पोषक ठरत आहे. येत्या २४ तासात विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज नागपूरच्या हवामान केंद्राने वर्तविला आहे.
मृग नक्षत्रात पावसाने काही दिवस ताण दिला होता. आद्र्रा नक्षत्रात मात्र भरपूर पाऊस होत आहे. नैऋत्य मोसमी वारे पुन्हा सक्रिय झाल्याने विदर्भात बुलढाणा वगळता इतर जिल्ह्य़ांमध्ये गेल्या दोन दिवसात चांगला पाऊस झाला. गोंदियात सर्वाधिक ७३.४ मि.मी. पाऊस झाला असून त्या खालोखाल चंद्रपूर जिल्ह्य़ात ४७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. अकोला २०.६, अमरावती १४.४, यवतमाळ १२.६, वाशीम १२.१  तर नागपूर जिल्ह्य़ात ४५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. पुढील चोवीस तासात विदर्भात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तविला आहे.  विदर्भात दहा जूनला मान्सूनचे आगमन झाल्यानंतर पहिल्या आठवडय़ात चांगला पाऊस झाला होता. त्या पावसाच्या भरवशावरच शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या केल्या. आद्र्रा नक्षत्रातील पावसाने पेरणीला चांगला वेग आला आणि बहुतांशी भागातील पेरण्या पूर्ण होत आल्या आहेत. काही दिवसांच्या अंतराने होत असलेला हा पाऊस पिकांसाठी पोषक ठरत आहे. शेतकऱ्यांची कामेही वेळेवर होत आहेत. गोंदिया, भंडारा, गडचिरोली व चंद्रपूर या धान पट्टय़ातही चांगला पाऊस होत असल्याने धान लागवडीसाठी उपयुक्त ठरत आहे.
विदर्भात आतापर्यंत ब्रह्मपुरीला सर्वाधिक ६०६.४ मि.मी., तर सर्वात कमी २१६ मि.मी. पाऊस बुलढाणा जिल्ह्य़ात झाला आहे. पिकांना पावसाची गरज असल्याने जिल्ह्य़ातील शेतकरी पावसाची प्रतीक्षा करीत आहेत.