दुष्काळाच्या तीव्र झळा सोसणाऱ्या उत्तर महाराष्ट्राने एप्रिलच्या मध्यावर हंगामातील सर्वोच्च तापमानाची नोंद केली असून थंड हवेचे ठिकाण समजल्या जाणाऱ्या नाशिकचा पारा ३९.१ अंशावर गेला असताना दुसरीकडे जळगाव जिल्हा ४२ अंशाचा पल्ला ओलांडण्याच्या मार्गावर आहे. धुळे व नंदुरबार जिल्ह्यात नाशिकप्रमाणे स्थिती आहे. टळटळीत ऊन आणि कमालीचा उकाडा या कोंडीत सापडलेल्या सर्वसामान्यांना पाणी टंचाई व वीज भारनियमनाचे चटके सोसावे लागत आहेत. वाढत्या तापमानामुळे आरोग्याच्या तक्रारींमध्येही वाढ झाल्याचे दिसत आहे.
महिन्यापासून सातत्याने वाढणाऱ्या तापमानाने एप्रिलच्या मध्यावर आतापर्यंतची कमाल पातळी गाठली असून प्रचंड उष्म्याने जनजीवनावर विपरित परिणाम झाला आहे. राज्यात तापमानाची सर्वाधिक नोंद होणाऱ्या जळगाव जिल्ह्याचा पारा ४२ अंशापर्यंत गेला असून नाशिकमध्ये तापमान चाळीशीच्या उंबरठय़ावर आहे.
 १३ एप्रिलला नाशकात सर्वाधिक ३९.१ अंश सेल्सिअस इतक्या सर्वोच्च तापमानाची तर धुळ्यात यापेक्षा अधिक म्हणजे ३९.४ अंशाची नोंद झाली आहे. मालेगाव व नंदुरबार भागातील तापमानात कमी-अधिक प्रमाणात हीच पातळी आहे. हंगामातील उच्चांकी नोंद केल्यानंतर नाशिकचे तापमान चार अंशांनी कमी झाले. नाशिकच्या तापमानाची आकडेवारी पाहिल्यास दिवसा वाढणारे तापमान रात्री निम्म्याने कमी होते. यामुळे दिवसा उन्हाच्या झळा सोसाव्या लागत असल्या तरी रात्र गारव्यामुळे काहिशी सुखद होत असल्याची अनुभूती येते. संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात उन्हामुळे अंगाची काहिली होत असली तरी आणि बहुतांश जण दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे टाळत असले तरी २७ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या लगीन सराईमुळे सराफ बाजार व कपडय़ांच्या दुकानांमध्ये गर्दी दिसत आहे. इतर व्यवसायांवर मात्र उन्हाचा परिणाम जाणवत आहे. दुपारी बाजारपेठांमधील थंडावलेले व्यवहार सायंकाळनंतर पुन्हा जोमाने सुरू होतात. जळगावकरांना प्रारंभी फारशी न जाणवलेली उन्हाची झळ एप्रिल महिन्यात चांगलीच बसली. वाढत्या तापमानाने आरोग्यावर विपरित परिणाम होऊ नये याकरिता योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना वैद्यकीय तज्ज्ञांकडून केल्या जात आहेत. शासकीय रुग्णालयांत उष्माघात कक्षांची स्थापना करण्यात आली आहे.
वाढत्या उष्णतेचा परिणाम आरोग्यावरही होत आहे. उन्हाळी लागणे, डोळे येणे किंवा लाल होणे, तोंड येणे, हातापायाची आग होणे, मूळव्याध, अंगावर पित्त उभारणे, लघवीला जळजळ होणे अशा विविध व्याधींना सर्वसामान्यांना सामोरे जावे लागत आहे. या काळात शरीराबरोबर मनावरही विपरित परिणाम होतो. उत्साह वाटत नाही. यामुळे आयुर्वेदाने ग्रीष्म ऋतुचर्येचे पालन करावे, असे म्हटले असल्याची माहिती वैद्य विजय कुलकर्णी यांनी दिली. उन्हात बाहेर पडताना टोपी व गॉगलचा वापर करावा. बाहेरून घरात आल्यानंतर प्रथम गार पाण्याने हात-पाय स्वच्छ धुणे आवश्यक आहे. लगेचच गार पाणी पिऊ नये. कारण, तसे केल्यास उष्माघाताचा त्रास होऊ शकतो. वातानुकूलीत यंत्राचा कमीतकमी वापर करणे हितावह आहे. या यंत्रणेमुळे बाहेरील तापमान सहन करणे शरीराला जिकीरीचे ठरते. आहारात तिखट पदार्थ व दही टाळून दूध, तुपाचा वापर वाढविणे आवश्यक असल्याचे कुलकर्णी यांनी नमूद केले.
दरम्यान, उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी वाळाची तावदाने, टोप्या, पंखे, तत्सम वस्तुंच्या विक्रीत वाढ झाली आहे. तसेच आईस्क्रिम, थंड पेय, कलिंगड यांनाही मागणी आहे. शहरी भागात फारसे वीज भारनियमन केले जात नसल्याने शहरवासीयांना उन्हाळा सुसह्य करण्याचा मार्ग उपलब्ध असला तरी ग्रामीण भागात मात्र नेमके उलट चित्र आहे. सलग १० ते १२ तासांच्या भारनियमनामुळे तप्त झळांचा सामना करावा लागत आहे. मनमाडकरही दोनवेळच्या भारनियमनाने वैतागले आहेत. सायंकाळी वीज नसल्याने शहर व प्रमुख बाजारपेठेत अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते.
बाष्पीभवनाने धरणांमधील जलसाठय़ावर परिणाम
उन्हाचा परिणाम धरणांतील पाण्याचे बाष्पीभवन जलद होण्यात झाला असून त्यामुळे बहुतांश धरणातील पातळी दोन ते तीन दशलक्ष घनफूटने कमी होत आहे. उष्णतेच्या लाटेत बाष्पीभवनाचा वेग असाच कायम राहिल्यास जेथे मुळातच जलसाठा कमी आहे, ती धरणे पूर्णत: कोरडी पडण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे. यामुळे पाणी टंचाईचे संकट भीषण स्वरूप धारण करण्याची शक्यता आहे. एप्रिलच्या मध्यावर उत्तर महाराष्ट्रात ४० ते ४२ अंशावर चढलेला पारा मे महिन्यात कोणती उंची गाठणार, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.