प्रत्येकाच्या स्वप्नात एक घर असते. असेच स्वप्न आयआयटी आणि आयआयटी आणि रचना संसद अ‍ॅकडमी ऑफ आíकटेक्चरच्या ‘टीम शून्य’ने पाहिले आणि त्यांनी एक भन्नाट शक्कल लढवत सौरऊर्जेवर आधारित घराची निर्मिती करण्याचा संकल्प सोडला. या घराचे काम ८० टक्के पूर्ण झाले असून ते लवकरच जागतिक स्तरावर होणाऱ्या ‘सोलार डेक्लोथॉन २०१४’  स्पध्रेत सहभागी होणार आहे.
जून महिन्यात फ्रान्समध्ये ही स्पर्धा होणार आहे. या स्पध्रेत सहभागी होताना काही तरी नावीन्यपूर्ण प्रकल्प सादर करावा असे मनात घेऊन ‘टीम शून्य’ कामाला लागली आणि त्यातून सूर्यघर अर्थात सौर घर उभारण्याचे काम सुरू झाले. ही संकल्पना मांडून त्याच्या वैज्ञानिक, तांत्रिक आदी सर्व बाबी पडताळून ते प्रत्यक्षात उभारण्यास वर्षांहून अधिक काळ गेला. या घराला लवकरच मूर्त स्वरूप येणार असून याची झलक गुरुवारी आयआयटीमध्ये पाहवयास मिळाली. ८४० चौरस फूट जागेवर हे घर तयार करण्यात आले आहे. हे घर ‘टूबीएचके’ असून घरातील सर्व उपकरणे सौरऊर्जेवर चालणार आहेत. यासाठी घराच्या छपरावर पाच किलोवॉटचे सौर पॅनेल उभारण्यात येणार आहे.
या घरात सर्व सुखसुविधा देण्यात आल्या आहेत. मोबाइल किंवा टॅबलेटच्या माध्यमातून आपण घराचे नियंत्रण करू शकणाऱ्या ‘झिग बी’वर आधारित तंत्रज्ञान यामध्ये वापरण्यात आले आहे. या घरामध्ये काही नवीन शक्कल लढविण्यात आल्या असून यात सौरऊर्जेवर चालणारा ओव्हन, कपडे वाळविण्याचे यंत्र या गोष्टींचाही समावेश आहे. घरातील कपडे वाळविण्याचे यंत्र हे एसीच्या टाकाऊ पदार्थापासून केले जाणार आहे. हे तंत्रज्ञान या विद्यार्थ्यांनी खास विकसित केले आहे. या घरात वापरलेल्या पाण्याचा पुनर्वापर करण्याची सुविधाही असणार आहे.
हे घर तयार करताना विद्यार्थ्यांनी पर्यावरणाची कोणतीही हानी होणार नाही याची विशेष दक्षात घेतली आहे. हे घर उभारण्यासाठी वापरण्यात आलेली साधने ही अशा स्वरूपाची आहेत की ज्यामुळे आपले घर सोलार पॅनलमुळे तापत नाही. तसेच घराच्या वापरासाठी लागणारे गरम पाणी घराच्या बाजूला ४.५ चौरस मीटरच्या परिसरात बसविण्यात आलेल्या सोलार थर्मल कलेक्टरमधून उपलब्ध होऊ शकणार आहे.
सध्या स्पध्रेसाठी तयार करण्यात आलेले हे घर भविष्यात प्रत्यक्षात भारतातील निमशहरी भागांत विकसित करण्याचा या विद्यार्थ्यांचा मानस आहे. विद्यार्थ्यांच्या या प्रयोगाला आयआयटी मुंबईच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांनीही कौतुकाची थाप दिली. लोकांचे जीवनमान सुधारतानाच ग्रामीण भागात विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे फायदे पोहोचावेत यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. त्या दृष्टीने सौरघरांचा प्रकल्प आदर्श ठरू शकतो. हा प्रकल्प अभियांत्रिकी क्षेत्रासाठीही आदर्श आहे, असे मत डॉ. काकोडकर यांनी व्यक्त केले. हे घर २५ ते ३० लाख रुपयांत उभारता येणार आहे.