पालकांच्या श्रमाकडे दुर्लक्ष केलेल्या लाडावलेल्या तरुणाईने कळस घातला असून रात्री उशिरापर्यंत मद्याच्या नशेत धुंद होऊन गोंधळ घालण्यापर्यंत मजल गेली आहे. बुधवारी मध्यरात्रीनंतर झालेला अपघात याचेच द्योतक ठरले आहे. त्यामुळे लाडावलेल्या तरुणाईवर वेळीच वेसण घालण्याचीही गरज निर्माण झाली आहे.
बेभान तरुण चालकाचे नियंत्रण सुटल्याने सुसाट कार रस्त्याच्या कडेला झाडावर आदळून तरुण व तरुणी जागीच ठार झाले तर दोघे जखमी झाले. गंभीर जखमी तरुणीवर दंदे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अंगाचा थरकाप उडविणारा हा भीषण अपघात अमरावती मार्गावरील भरतनगरात एलआयटीसमोर मध्यरात्रीनंतर साडेबारा वाजताच्या सुमारास घडला. कारमधील तरुण मद्यधुंद असल्याचे घटनास्थळी बोलले जात होते. अनुराग अनिल खापर्डे (रा. राजनगर) व इशिष्ठा मालव मोहन (रा. औरंगाबाद) ही ठार झालेल्यांची नावे आहेत. श्रेया जगदीश जोशी (रा. रायगड, छत्तीसगड) व उज्ज्वल गुटगुदिया (रा. वापी, गुजरात) ही गंभीर जखमींची नावे आहेत. दोघे तरुण यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी तर दोघी तरुणी वर्धा मार्गावरील पलोती अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी आहेत. हे चारहीजण काल रात्री अमरावती मार्गाकडे फिरायला गेले होते.
मध्यरात्रीनंतर साडेबारा वाजताच्या सुमारास ते कारने (एमएच/३१/डीके/१९०९) रविनगरकडे वेगात येत होते. फुटाळा तलावाकडून उतार आहे. त्यातच कार वेगात होती. कार चालवित असलेल्या अनुरागचे नियंत्रण सुटले. कार डावीकडे रस्त्याच्या कडेला चिन्मय मिशनच्या कार्यालयासमोरील पदपथावर चढली. समोरच्या झाडाला घासत उजवीकडे वळली. झाड व शेजारच्या राज लक्ष्मण बंगल्याच्या संरक्षण भिंत यामधील अरुंद जागेतून पुढे गेली आणि पुन्हा उजवीकडे वळून थांबली. कारमध्ये मागे बसलेली तरुणी उंच उडून बंगल्याच्या अंगणात आपटली, असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. कारचे सुटे भाग तुटून दूरवर जाऊन पडले. बंगल्याच्या लोखंडी फाटकाचे बार तुटले. जोरदार आवाजाने लोक जागे झाले. ते धावत घराबाहेर आले. माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या अंबाझरी पोलिसांसह नागरिकांनी चुराडा झालेल्या कारमधून महत्प्रयासाने चारहीजणांना बाहेर काढले. कारमधील दोन तरुण व तरुणी मौजमजा करण्यासाठी गेले होते. तरुण मद्यधुंद होते, असे पोलिसांना समजले. कारमध्ये काही हॉटेलचे कार्ड सापडल्याचे लोक सांगतात. हे चौघे नक्की कुठे गेले होते, हे पोलिसांनी तपास केल्यानंतर समजणार आहे.

बेधुंद तरुणाई : आजची तरुणाई बेधुंद झाली असून रात्री उशिरापर्यंत मद्याच्या नशेत धुंद होऊन गोंधळ घालण्यापर्यंत तिची मजल गेली आहे, असे बोलले जात होते. त्यास या घटनेने उजाळाच दिला आहे. ग्रेट नाग रोड, धरमपेठ, हिंगणा भागात हे दृश्य नित्याचेच झाले आहे. फुटाळा, तेलंखेडी, जीपीओ ते लेडीज क्लब रस्ता, रामगिरीसमोरचा रस्ता येथे तरुण-तरुणी चाळे करताना दिवसा आणि रात्रीही दिसतात. नागपूर शहरातील सिनेमागृहे, रेस्टारंट, मद्यालयांमध्ये तरुणांचीच संख्या जास्त असते. सिनेमागृहे व रेस्टारंटमध्ये तरुण-तरुणींना जाणे गैर नाही. फिरायला जाण्यातही गैर नाही. मात्र, प्रेमाच्या नावावर अश्लील चाळे (तेही उघडपणे), रात्री उशिरापर्यंत मौजमजा, अनैतिक प्रकार, बेभानपणा, उद्दामपणा, मद्यधुंद ही लक्षणे ठीक नाहीतच. आजची तरुणाई बेभान झाली आहे, हे स्पष्ट आहे. काही तरुण-तरुणी याला नक्कीच अपवाद आहेत. आई-वडीलसुद्धा माणसेच असतात ना. पण, पाल्यांचे भविष्य घडविण्याच्या उद्देशाने त्याला उच्चशिक्षण देतात. त्यासाठी प्रचंड खर्च येतो. त्यासाठी पालक पदरमोड करतात, कर्ज काढतात. काही पालक कोंडय़ाचा मांडा करून, स्वत:च्या आवडीनिवडीकडे दुर्लक्ष करतात. हाडाची काडे करून पाल्यांसाठी पैसे पुरवित असतात. पालकांच्या श्रमाकडे दुर्लक्ष केलेल्या लाडावलेल्या तरुणाईने कळस घातला आहे. बाप श्रीमंत असला तरी पैशाचे मोल असणारा मुलगा पैसे उडविणार नाही. पण, तारुण्याचा वारा कानात शिरलेल्या, ‘घडी दो घडी मजा करले’ यात मश्गुल तरुणाईला हे मोल समजणार कधी? असा प्रश्न निर्माण झाला आहे.