जिल्हा श्रमिक संघटनेच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी घरेलू कामगार महिलांचा मोर्चा आज दुपारी सहायक कामगार आयुक्त कार्यालयावर काढण्यात आला. जिल्ह्य़ातील प्रत्येक तालुक्यातून अनेक मोलकरणी महिला मोर्चात सहभागी झाल्या होत्या.
मोर्चाची पुर्वसुचना दिल्यानंतरही सहायक कामगार आयुक्त बाळासाहेब वाघ कार्यालयात उपस्थित नसल्याबद्दल महिलांनी तीव्र संताप व्यक्त केला. निवेदन स्वीकारण्यासाठी आलेले कामगार अधिकारी श्री. लाव्हळ यांनाच त्यांनी मग धारेवर धरले. महिलांच्या मागण्या सरकापर्यंत पोहचवण्याचे आश्वासन लाव्हळ यांनी महिलांना दिले व आपली सुटका करून घेतली.
आनंदराव वायकर, अनंत लोखंडे, नंदू डहाणे, अनिता कोंडा, बाळासाहेब सुरूडे, राजेंद्र बावके, मदिना शेख, रेखा चासकर, अनिल भोसले आदींनी मोर्चाचे नेतृत्व केले. राज्य सरकारच्या घरेलू कामगार मंडळाचे सदस्य उदय भट, पुणे मोलकरीण संघटनेच्या अध्यक्षा मेधा थत्ते खास मोर्चासाठी म्हणून नगरला आले होते. त्यांनी मोर्चेकरी महिलांना मार्गदर्शन केले.
वायकर यांनी सांगितले की फक्त मंडळ काढून सरकार शांत बसले आहे. मंडळाला कसला निधी दिलेला नाही, घरेलू कामगारांची नोंदणी करण्याचे काम प्रत्येक जिल्ह्य़ात सहायक कामगार आयुक्त कार्यालयाकडे सोपवले आहे, मात्र त्यांना त्यासाठी कर्मचारी वर्ग नाही, कार्यालय नाही. तसेच त्यांनी नोंदणी करून नावे वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवल्यानंतर तिथून ओळखपत्र येणार आहे, तेही लवकर येत नाही. दुसरी कसली हालचाल करायला सरकार तयार नाही.
लोखंडे यांनी कामगारांच्या मागण्या मांडल्या. मंडळाला १०० कोटी रूपयांचा निधी द्यावा, नोंदणीकृत घरेलू कामगारांना दारिद्रय रेषेखालीली कुटुंबांना असणारी शिधा पत्रिका द्यावी, घरकूल योजनांमध्ये त्यांना सामावून घ्यावे, निवृत्ती वेतन योजना लागू करावी, पाल्यांना तांत्रिक शिक्षणाची संधी उपलब्ध करून द्यावी, बचत गट स्थापन करून द्यावेत, राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजनेत त्यांचा समावेश करावा, मंडळावर संघटनेच्या प्रतिनिधींनी सदस्य म्हणून घ्यावे अशा मागण्या त्यांनी केल्या.
या सर्व मागण्या सरकार स्तरावरच्या असल्याचे लव्हाळे यांनी सांगितले. त्यावर मग तुम्ही आतापर्यंत काय केले ते सांगा अशी विचारणा संतप्त स्वरात महिलांनी केली. मोलकरणींच्या कसल्याही मागण्यांचा सरकारस्तरावर तुमच्या कार्यालयाने काहीही पाठपुरावा केलेला  नाही, फक्त नावे नोंदवून घेण्यात येतात, साधे ओळखपत्रही अद्याप देता आलेले नाही अशी टीका करण्यात आली. सर्व मागण्या सरकारला कळवू असे नेहमीचे आश्वासन लव्हाळे यांनी दिल्यावर मोर्चा विसर्जीत करण्यात आला.