पावसाळ्यापूर्वी नालेसफाईचे दौरे करून ठाणेकरांपुढे स्वतला यथेच्छ मिरवून घेणाऱ्या सर्वपक्षीय नेत्यांना डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी घटना बुधवारी घडली. पहाटेच्या सुमारास मुसळधार पाऊस सुरू झाला आणि ठाण्यातील इंदिरानगर भागातील नाला काही मिनिटातच तुंबला. या नाल्यातील पाणी परिसरातील ८० घरांमध्ये शिरले आणि अनपेक्षित घडलेल्या या घटनेमुळे घरांमधील संसाराचा अक्षरश चिखल झाला. ठाणे, कळवा, मुंब्रा भागांतील नालेसफाईची कामे मंदगतीने सुरू असल्याची ओरड गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सुरू आहे. या तक्रारीला बुधवारी पहाटेच्या घटनेमुळे एकप्रकारे पुष्टी मिळाली.  
ठाणे महापालिका प्रशासनाने पावसाळ्याच्या पाश्र्वभूमीवर शहरातील सर्वच नालेसफाईची कामे आधीच उशिरा हाती घेतली असतानाच ठेकेदारांकडून सुरू असलेली नालेसफाई पुरेशा तत्परतेने होत नसल्याचे उघड झाले आहे. दरवर्षी पावसाळ्याच्या पाश्र्वभूमीवर शहरातील सर्वच नाल्यांची दोन महिने आधी साफसफाई करण्यात येते. महापालिका आयुक्त आर. ए. राजीव यांनी गेल्या दोन वर्षांत पावसाळ्यापूर्वीची कामे युद्धपातळीवर हाती घेतली. कामचुकार कंत्राटदारांना राजीव यांनी काळ्या यादीत टाकले तर काहींना दणका दिला. राजीव यांच्या अनुपस्थितीत यंदा मात्र पावसाळ्यापूर्वीच्या कामांचे तीनतेरा वाजल्याचे चित्र दिसू लागले आहे. महापालिका प्रशासनाने जेमतेम महिनाभर आधी नालेसफाईची कामे हाती घेतली आहेत. महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मध्यंतरी नालेसफाईच्या कामाचा आढावा घेऊन संबंधित अधिकारी तसेच ठेकेदारांना ही कामे लवकरात लवकर उरकण्याचे आदेश दिले होते. महापौरांसह महापालिकेतील सर्वच राजकीय पदाधिकाऱ्यांनी दौरे काढून पावसाळापूर्वीच्या कामांची पाहाणी केली. या पाहाणी दरम्यान शहरातील नालेसफाई चांगल्याप्रकारे सुरू असल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात येत होता. प्रत्यक्षात चित्र उलटे दिसू लागले आहे. वागळे इस्टेट येथील इंदिरानगर परिसरात मोठा नाला असून त्याची सुरुवात याच परिसरातून होते. जवळच असलेल्या मामा-भाचे या डोंगरातून येणारे पाणी याच नाल्यातून वाहते. तसेच या नाल्याच्या आसपास मोठय़ाप्रमाणात वस्ती आहे. गेल्या काही दिवसांपासून महापालिका प्रशासनाने या नाल्याची साफसफाई सुरू केली आहे. असे असतानाही बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे हा नाला तुंबला आणि त्याचा फटका आसपासच्या वस्तीत राहणाऱ्या रहिवाशांना बसला. सुमारे ७० ते ८० घरांमध्ये या नाल्याचे पाणी शिरल्याने रहिवाशांची धावपळ झाली. तसेच घरातील वस्तू पाण्यात भिजल्याने त्यांचे मोठय़ा प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे शहरातील नालेसफाई करण्यासाठी जागृत असल्याचा आव आणणाऱ्या महापालिकेच्या ढिसाळ नियोजनाचे दर्शन पहिल्याच पावसामध्ये ठाणेकरांना झाले.