सोलापूरच्या थोर चार हुतात्म्यांच्या नावाने स्थापन होणाऱ्या प्रतिष्ठानच्यावतीने येत्या ४ एप्रिल रोजी विज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या चौघा जणांना तसेच अन्य चार शाळांना ‘हुतात्मा पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
मोहोळ तालुक्यातील अंकोली येथे विज्ञानाचा वापर करून ग्रामसुधारणा करणारे वैज्ञानिक डॉ. अरूण देशपांडे यांच्यासह सोलापूर विज्ञान केंद्राचे सल्लागार डॉ. व्यंकटेश गंभीर, अश्विनी ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ.माधवी रायते व विज्ञान विषयात राष्ट्रपतींचा पुरस्कार मिळविणारे ज्येष्ठ विज्ञान शिक्षक सिध्देश्वर म्हेत्रे (मंद्रूप, ता.  दक्षिण सोलापूर) हे या पुरस्काराचे मानकरी आहेत. याशिवाय इंडियन मॉडेल स्कूल (जुळे सोलापूर-इंग्रजी माध्यम), संभाजीराव शिंदे प्रशाला (विडी घरकूल-मराठी माध्यम), सिध्देश्वर प्रशाला (कन्नड माध्यम) व प्रोग्रेसिव्ह उर्दू प्रशाला (लष्कर-उर्दू माध्यम) या शाळांनाही या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. या पुरस्काराची घोषणा हुतात्मा प्रतिष्ठानचे अध्यक्ष जगदीश मुनाळे व सचिव सातलिंग षटगार यांनी पत्रकार परिषदेत केली.
भारतीय स्वातंत्र्य लढय़ात एकमेव सोलापुरात १९३० साली मार्शल लॉ चळवळ झाली. यात मल्लप्पा धनशेट्टी, जगन्नाथ शिंदे, श्रीकिशन सारडा व अब्दुल रसूल कुर्बान हुसेन या चौघा देशभक्तांना फासावर चढविण्यात आले होते. हे चार हुतात्मे सोलापूरच्या स्वाभिमानाचा केंद्रबिंदू असून त्याबद्दल जनमानसात प्रबोधन करण्याचा प्रयत्न हुतात्मा प्रतिष्ठान करणार आहे. हुतात्म्यांचे स्मरण व चिंतन करताना सोलापूरवर अन्याय होऊ देणार नाही,याबाबतची जागरूकता निर्माण करण्याचा मानसही षटगार यांनी बोलून दाखविला. येत्या ४ एप्रिल रोजी सायंकाळी चार वाजता डॉ.निर्मलकुमार फडकुले नाटय़गृहात आयोजित समारंभात हुतात्मा प्रतिष्ठानची अधिकृत स्थापना होणार असून याचवेळी पुरस्काराचे वितरण होणार आहे. या वेळी सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.  एन. एन. मालदार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम कासार हे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. या प्रसंगी काँग्रेसचे स्थानिक नेते विष्णुपंत कोठे व माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे हे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती षटगार यांनी दिली. या पत्रकार परिषदेस हुतात्मा प्रतिष्ठानचे पदाधिकारी चित्तरंजन शहा, मोहन वैद्य, जहाँगीर शेख, प्रफुल्ल दळवी आदी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hutatma award to scientists and schools
First published on: 31-03-2013 at 01:30 IST