करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सत्ताधारी माजी आमदार जयवंत जगताप गटाने १७ पैकी १३ जागा जिंकून आपले वर्चस्व कायम राखले, तर केवळ ४ जागा मिळालेल्या राष्ट्रवादीच्या आमदार श्यामल बागल यांच्या गटाला बाजार समितीची सत्ता हिसकावून घेण्यास पुन्हा एकदा अपयश आले.
या निवडणुकीत जयवंतराव जगताप यांनी स्वत: सहकारी संस्था गटातून सर्वाधिक ८०६ मते मिळवून विजय संपादन केला, तर आमदार श्यामल बागल यांच्या दिगंबर बागल स्वाभिमानी पॅनेलचे नेते तथा मकाई साखर कारखान्याचे अध्यक्ष दिग्विजय बागल व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांच्यासह सोलापूर जिल्हा मजूर संस्था महासंघाचे उपाध्यक्ष सतीश शेळके, मकाई साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. ज्ञानदेव देवकर आदींना पराभवाची नामुष्की पत्करावी लागली. ग्रामपंचायत गटातून चार जागांवर बागल गटाला विजय मिळविणे शक्य झाले. या निवडणुकीत जगताप गटाच्या पाठीशी मोहिते-पाटील गटाने तसेच जेऊरचे नारायण पाटील गटाने ताकद उभी केली होती, तर बागल गटाला उपमुख्यमंत्री अजित पवार समर्थकांची साथ होती.
गेल्या अनेक वर्षांपासून करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीवर वर्चस्व राखणाऱ्या जगताप गटाच्या विजयी उमेदवारांची नावे अशी: सहकारी संस्था गट-जयवंतराव जगताप (८०६ मते), नसरूल्ला खान (७६४), दादासाहेब जाधव (७७८), जालिंदर पानसरे (७७१), देवानंद बागल (७९१), बाबासाहेब बोरकर (७६४), ज्ञानेश्वर साखरे (७६०), व्यापारी गट-विजय गुगळे (२७८) व सुनील मेहता (२७३), महिला राखीव-उर्मिला संतोष थोरबोले (८०५), सुप्रिया अनिल सुरवसे (७८८), इतर मागासप्रवर्ग-दत्तात्रेय आडसूळ (८०२), भटक्या विमुक्त जाती जमाती-सर्जेराव घरबुडवे (८०२). हमाल-तोलार गटातून मनोज गोडसे हे यापूर्वीच अविरोध निवडून आले होते.
तर बागल गटाचे ग्रामपंचायत प्रवर्गातून सुग्रीव नलवडे (४७४), अजिनाथ खाटमोडे (४८५) व कैलास पाखरे (४९३) हे निवडून आले, तर आर्थिक दुर्बल गटातून शहाजी राऊत (४९१) हे निवडून आले.