नगरपालिकेचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्यामुळे शहरातील आरोग्य धोक्यात आले आहे. नागरिकांच्या मोठय़ा प्रमाणावर तक्रारी असूनही पालिका त्याकडे लक्ष देण्यास तयार नसल्याची तक्रार माजी आमदार अप्पासाहेब चव्हाण यांनी केली.
स्वच्छतेच्या संदर्भात पालिका कमालीची उदासीन असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला. ते म्हणाले की, शहराच्या सर्व भागात कचऱ्याचे ढीग साठले असून गटारी तुंबल्या आहेत. त्यामुळे डासांचे साम्राज्य पसरले असून ताप व अन्य रुग्ण मोठय़ा संख्येने दवाखान्यांतून दाखल होत आहेत. काही दिवसांपूर्वी काही डॉक्टरांनी शहरात तापाचे, तसेच डेंग्यूसदृश रुग्ण वाढत असल्याची तक्रार केली होती. शहरात विविध प्रकारच्या तापाचे पाच हजारांवर रुग्ण असल्याची तक्रार डॉक्टरांचा समावेश असलेल्या सामाजिक संस्थेने केली होती. परंतु त्याकडे गांभीर्याने पाहण्यास नगरपालिका तयार असल्याचे दिसत नाही.
चव्हाण म्हणाले की, घाणीचे साम्राज्य नसलेला भाग शहरात शोधूनही सापडणार नाही. सफाईचे काम व्यवस्थित होणे आरोग्याच्या संदर्भात अतिशय आवश्यक आहे. पालिकेत या बाबत तक्रारी करूनही काहीच उपयोग होत नाही. शहरातील अनेक नागरिकांनी या बाबत आपले गाऱ्हाणे पालिकेत मांडले. आपलाही अनुभव यापेक्षा वेगळा नाही. आपले निवासस्थान असलेल्या माळीपुरा भागातील अस्वच्छतेविषयी आपण संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडे अनेकदा तक्रारी केल्या. परंतु जणू काही हे आपले कामच नाही, अशा आविर्भावात ते आहेत. माजी आमदाराच्या तक्रारीकडे पालिका एवढे दुर्लक्ष करीत असेल तर सर्वसामान्यांच्या तक्रारींचे काय याची कल्पनाच न केलेली बरी, असेही चव्हाण म्हणाले.