शहरातील झुलेलाल नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाने कोटय़वधीचे कर्ज बेकायदेशीर व नियमबाह्य़ पद्धतीने वाटप केल्याचा ठपका लेखा परीक्षण अहवालात ठेवण्यात आला आहे.
जिल्हा उपनिबंधकांच्या आदेशानुसार शासकीय अपर विशेष लेखा परीक्षक एन. डी. गादेकर यांनी कलम ८१ (१) नुसार २०१० ते २०१२ या कालावधीचे लेखा परीक्षण केले आहे. या परीक्षणासाठी संस्थेच्या विद्यमान अध्यक्ष स्वाती साधवानी, उपाध्यक्ष अर्जुन ललवाणी आणि व्यवस्थापक आर. एस. जाधव यांनी कागदपत्रे उपलब्ध करून दिली. संस्थेच्या कागदपत्रात नोंद न करता परस्पर काही व्यवहार करण्यात आले असल्यास त्यास विद्यमान संचालक मंडळ व संबंधित अधिकारी, कर्मचारी जबाबदार राहतील, असे अहवालात म्हटले आहे.
काही कर्ज प्रकरणांमध्ये कर्जदार व जामीनदार हे एकमेकाला जामीनदार असल्याचे उघड झाले असून कर्ज मागणी अर्जावर स्वाक्षरीच्या ठिकाणी अंगठे दिलेले आहेत. व्यवसाय शेती असे नमूद करण्यात आले. परंतु शेतीचे पुरावे दिलेले नाहीत. कोणतेही अधिकृत पुरावे घेतल्याचे दिसून येत नाही. जामीनदारांचे कोणतेही अधिकृत माहितीदर्शक पत्रक दस्तऐवज कर्ज मागणी अर्जासोबत जोडलेले नाही. तसेच तारण असल्याचे पुरावे जोडण्यात आलेले नाहीत. आठ एप्रिल २००३ रोजी नावे टाकलेले ८५ हजार रूपयांच्या पावतीवर कर्जदाराची स्वाक्षरी अथवा अंगठा नाही. संस्थेची बहुतांशी गुंतवणूक असुरक्षित झालेली आहे. कर्जाच्या नावाखाली कोणत्याही प्रकारचे अधिकृत दस्तावेज न घेताच कर्ज निधी वितरित करण्यात आला आहे. लेखा परीक्षकांनी संबंधितांवर कारवाईचे आदेश न देताच अहवाल सादर केल्याचे दिसून येते. या संदर्भात संबंधितांशी समझोता झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. हा अहवाल पुनश्च छाननीसाठी पाठविला जाण्याची शक्यता आहे.