कन्हान नदीच्या पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे कन्हान जलशुद्धीकरण केंद्राला होणारा पाणीपुरवठा कमी झाला होता; परंतु ओसीडब्ल्यूने ही समस्या दूर करून कन्हान केंद्रातील पंपिंग सुरू केल्यामुळे उत्तर आणि पूर्व नागपुरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
 कन्हान नदीच्या पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे उत्तर आणि पूर्व नागपुरातील पाणीपुरवठय़ावर त्याचा परिणाम झाला होता. महापौर प्रा. अनिल सोले आणि महापालिका आयुक्त श्याम वर्धने यांनी याविषयी संबंधित विभागांची संयुक्त बैठक घेतली होती. ओसीडब्लल्यूने कोणत्याही परिस्थितीत २७ ऑक्टोबपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होईल, असा विश्वास दिला होता. प्रत्यक्षात पाण्याची पातळी सुरळीत करण्यात यश आले.
कन्हान जलशुद्धीकरण केंद्रात प्रत्येक तासाला १० हजार क्युबिक मीटर पाण्याचा उपसा केल्या जातो. तेथून उत्तर आणि पूर्व नागपुरात पाणीपुरवठा केल्या जातो. १६ ते २४ ऑक्टोबर दरम्यान फक्त प्रतितासाला ९ हजार क्युबिक मीटर प्रमाणे पाण्याचा उपसा करणे शक्य झाले. त्यामुळे त्याचा पाणीपुरवठय़ावर परिणाम झाला होता.
या केंद्राकडून सरासरी २२० ते २३० एवढा दशलक्ष पाणीपुरवठा होतो, पण नऊ दिवस पाण्याचा पुरवठा कमी होऊ शकला. ओसीडब्ल्यूने  नदीच्या पात्रातील वाळू उपसून पाण्याचा प्रवाह सुरळीत केला. कन्हान केंद्राच्या ४ पंपापैकी ३ पंपामधील पाण्याची पातळी घसरली होती. तसेच माती आणि गाळ साचला होता. त्यामुळे कार्यक्षमता कमी झाली होती. ओसीडब्ल्यूचे कामगार या पंपाच्या दुरस्तीसाठी कामाला लागले आणि पंपिंगचे काम व्यवस्थित सुरू झाले.
ओसीडब्ल्यूचे मुख्य कार्यकारी जिल फियाद, उपसंचालक शशांक वैजनापूरकर, प्रभारी प्रवीण शरण, कन्हान जलशुद्धीकरण केंद्राचे प्रभारी धीरज कोचे, शशंत सौरभ आदींच्या देखरेखीत पंपिंगचे काम करण्यात आले. आता पूर्ण क्षमतेने केंद्राचे काम सुरू झाल्याचे ओसीडब्ल्यूचे जनसंपर्क अधिकारी यांनी सांगितले.