नवीन होऊ घातलेल्या कराड ते बेळगाव (कर्नाटक) रेल्वे मार्गामध्ये कागल शहराचा समावेश केला जावा, अशी आग्रही मागणी खा. सदाशिवराव मंडलिक यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री सी. पी. जोशी व सेंट्रल रेल्वे पुण्याचे बांधकाम विभागाचे डेप्युटी चीफ इंजिनियर सुरेश पाखरे यांच्याकडे केली आहे.
सन २०११-१२ च्या रेल्वे अंदाजपत्रकामध्ये कराड ते बेळगाव या अदांजे २०० कि. मी. च्या रेल्वेमार्गाचा सव्‍‌र्हे व्हावा म्हणून तत्कालीन रेल्वेमंत्र्यांनी घोषणा केल्यानुसार हा सव्‍‌र्हे मध्य रेल्वेकडून करण्यात आला होता. या सव्‍‌र्हेमध्ये कराड-शिणोळी, तांबवे-इस्लामपूर, वाळवा-आष्टा-दुधगाव, कुंभोज हातकणंगले, इचलकरंजी, कारदगा, ममदापूर, निपाणी, संकेश्वर, दड्डी, हडीनगर, तांबेवाडी, बेळगाव या गावांचा समावेश आहे. मात्र या सव्‍‌र्हेमधून कागलला वगळण्यात आले आहे.
वास्तविक कागल शहराची लोकसंख्या सुमारे ३५ हजार इतकी असून लोकसंख्या झपाटय़ाने वाढते आहे. कागल पंचतारांकित एमआयडीसीमुळे कागलची औद्योगिक क्षेत्रात वाढ झपाटय़ाने होत आहे.या औद्योगिक वसाहतीतील कर्मचाऱ्यांची संख्याही
अधिक आहे.तसेच कागल हे पुणे-बेंगलोर हायवेवरील महत्त्वाचे शहर बनले आहे. सध्या वाढत असलेली इंधनाची दरवाढ लक्षात घेता, पर्यायाने रेल्वेकडे वळण्याची दाट शक्यता आहे म्हणून यामध्ये कागलचा समावेश झाला पाहिजे.