पुरोगामी विचारांचा जिल्हा म्हणून राज्यात कोल्हापूरची ओळख असली, तरी सध्या जिल्ह्य़ातील नेतृत्व मात्र पुरोगामित्वाला धक्का बसेल अशाप्रकारची विधाने करून आपली वैचारिक पातळी दाखविताना दिसत आहेत. राज्यमंत्री पदावरून मंत्रिपदाची अपेक्षा पाहणारे सतेज पाटील आणि ‘खासदार मी होणार’ असे म्हणत जिल्हाभर दौरे करू लागलेले धनंजय महाडिक हे थेट पाणी योजनेच्या मुद्यावरून परस्परांची उणीदुणी काढताना आपल्या पदाची शान घालवत चालले आहेत. टवाळक्या करणाऱ्या टपोरी पोरांनी एकमेकांना आव्हान दिल्याप्रमाणे हे दोघे तरुण नेते चक्क ‘आखाडय़ात उतर, हिसका दाखवितो’ अशी न शोधणारी भाषा जाहीरपणे व्यक्त करीत आहेत. त्यांच्या या वर्तनावरून अजूनही हे नेते आपल्या नांवाप्रमाणे ‘बंटी’ – ‘मुन्ना’ असल्याचीच शंका करवीरकरांना न येईल तर नवल.    
कोल्हापूरकरांचा शुद्ध व मुबलक पाण्याचा प्रश्न चाळीस वर्षांच्या संघर्षांनंतर थेट काळम्मावाडी पाइपलाइन योजनेला मंजुरी मिळाल्याने मार्गी लागला आहे. प्रत्यक्षात शहरवासीयांना काळम्मावाडीचे पाणी मिळेल तो सुदिन असेल. तथापि, या पाणी योजनेला मंजुरी मिळविल्याच्या मुद्यावरून स्थानिक नेतृत्व भलताच श्रेयवाद रंगला आहे. शहरात जागोजागी लागलेल्या फ्लेक्सद्वारा श्रेय उपटण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. कामगारमंत्री हसन मुश्रीफ, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर हे तीन नेते श्रेयवादात पुढे आहेत. अशातच धनंजय महाडिक यांनी श्रेयवादावरून त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी सतेज पाटील यांना टीकेचे लक्ष्य केले. पाणी योजनेला मंजुरी मिळाली तेव्हा जन्मही न झालेला मित्र श्रेय खेचत असल्याबद्दल महाडिक यांनी पाटील यांच्यावर खोचकपणे टीका केली होती.     
कोल्हापूर महापालिकेने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमप्रसंगी सतेज पाटील यांनी महाडिक यांचा त्यांच्या लोकसभा उमेदवारीचा धोषा लावणारे कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासमोरच शेलक्या शब्दात समाचार घेतला. ‘आम्हाला आडवे करण्याची भाषा मुश्रीफ उमेदवार करीत आहे. त्यांना सांगा की खासबाग मैदानाचे भूमिपूजन माझ्या हस्ते झाले आहे’ असे विधान करीत मंत्री पाटील यांनी एखाद्या मल्लाप्रमाणे खरोखरीच मुन्ना विरुद्ध दंड थोपटत चक्क लढण्याची भाषा केली. त्यावर महाडिक यांनीही आपण जातीवंत पैलवान असल्याचे सांगून प्रतिस्पध्र्याला लोळविण्यासाठी खासबाग मैदानात येण्याची तयारी आहे, अशी भाषा करून बंटीस प्रत्युत्तर दिले. राजकीय पटलावर मोठय़ा पदांचे स्वप्न पाहणाऱ्या बंटी व मुन्ना या दोघा नेत्यांकडून कोल्हापूरच्या पुरोगामी परंपरेला साजेशी अशी प्रगल्भ विचारसरणी अपेक्षित आहे. प्रत्यक्षात मात्र त्यांच्या तोंडून शिवराळ भाषा उमटू लागल्याने नागरिकांचे मनोरंजन होत आहे.  
पाणी प्रश्नावरून श्रेयवाद मांडला जात असताना मंत्री मुश्रीफ यांनी पाणी योजनेचे श्रेय जनतेचे असल्याचा दाखला दिला. अर्थात, हाच मुद्दा भाकपचे नेते कॉ.गोविंद पानसरे मांडत होते. सामान्य जनेतेने शुद्ध पाण्यासाठी वर्षांनुवर्षे टोकदार संघर्ष केला आहे. महापालिकेवर मोर्चा काढलेल्या महिलांच्या अंगावर अग्निशमन दलाकरवी पाण्याचा मारा करण्यापर्यंत त्या वेळच्या पालिकेतील सत्ताधाऱ्यांची मजल गेली होती. या अन्यायकारक कारवाई विरोधात कोल्हापूर बार असोसिएशनने आवाज उठविला होता. त्यामुळे महापौर व आयुक्त यांनाही दिलगिरी व्यक्त करावी लागली होती. या उदाहरणाची मांडणी करून पानसरे यांनी पाणी योजनेचे श्रेय सामान्यजनांचे कसे आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्यावरही टीका करीत श्रेयाचे धनी केवळ आपणच कसे आहोत हे सांगण्याचा आटापिटा सुरू राहिला. पाणी योजना पूर्ण होईपर्यंत श्रेयवाद आणखी किती रंगणार आणि या श्रेयाचे भांडवल करून लोकसभा, विधानसभा निवडणुकीचा फड कसा मारला जाणार, याकडे आता लक्ष वेधले आहे.
मंडलिक-मुश्रीफ वादाची उसळी
सतेज पाटील व धनंजय महाडिक यांच्यातील भांडण मिटविण्याची भाषा तंटामुक्ती फेम हसन मुश्रीफ यांनी केली आहे. दोघांच्यात भाऊबंदकी नसल्याने भांडण कशासाठी असे म्हणत तरुण नेत्यांना मोठा पल्ला गाठण्यासाठी रक्तरंजित संघर्ष टाळण्याचा सल्ला मुश्रीफ यांनी जाहीरपणे दिला आहे. मुश्रीफ यांचा तंटा मिटविण्याचा प्रयत्न स्तुत्य असला तरी ते व त्यांचे राजकीय गुरू खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्यातील संघर्ष कधी संपणार असा प्रश्न आहे. बंटी-मुन्ना यांच्यातील संघर्ष मिटविण्याचे वक्तव्य मुश्रीफ करीत असताना त्याच दिवशी मंडलिक यांनी मुश्रीफ यांचा पाणउतारा करीत होते.