कृषी ग्राहकांवरील वीज देयकाचा बोजा कमी करण्यासोबत आपल्या थकबाकीपैकी काही रक्कम तरी पदरात पडावी यासाठी महावितरणने कृषी संजीवनी योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेमुळे नाशिक व अहमदनगर जिल्ह्यांतील पाच लाख ८० हजार शेतकऱ्यांना संजीवनी मिळणार आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांच्या मूळ थकीत वीज देयकांच्या ५० टक्के म्हणजेच ४५१.३५ कोटींचे देयके माफ होणार असल्याचे महावितरणने म्हटले आहे.
थकबाकीतून मुक्त होण्याची संधी या योजनेच्या माध्यमातून चालून आली आहे. या योजनेचा थेट लाभ नाशिक व नगर परिमंडळातील लाखो शेतकऱ्यांना होईल. नाशिक ग्रामीण व अहमदनगर परिमंडळात शेतकऱ्यांकडे कोटय़वधीची थकबाकी आहे. या योजनेंतर्गत वीज देयक थकीत असणाऱ्या कृषी पंपधारकांच्या देयकावरील व्याज आणि दंड माफ होणार आहे. नाशिक परिमंडळातील ५.८० लाख शेतकऱ्यांचे ५२१ कोटी रुपयांवरील व्याज माफ होईल. तसेच १८ कोटी रुपयांची दंडाची रक्कमही माफ होईल. या योजनेंतर्गत कृषी पंपधारकांनी ३१ मार्च २०१४ पर्यंतच्या थकबाकीतील मूळ रकमेच्या ५० टक्के रक्कम एकरकमी अथवा तीन हप्त्यांत भरल्यास उर्वरित ५० टक्के मूळ रक्कम व थकीत दंड व व्याज पूर्णपणे माफ होईल. जे शेतकरी तीन टप्प्यांत ही रक्कम भरतील त्यांना पहिला हप्ता २० टक्के ३१ ऑगस्ट २०१४ पर्यंत, दुसरा हप्ता २० टक्के ३१ सप्टेंबर २०१४ पर्यंत आणि उर्वरित रक्कम ३१ ऑक्टोबपर्यंत भरावयाची आहे. कृषी पंपग्राहक ५० टक्के रक्कम एकरकमी भरू शकतात. याशिवाय ३१ मार्चपर्यंत ज्या शेतकऱ्यांकडे कृषी पंपाची कोणतीही थकबाकी नाही, त्यांना पुढील दोन त्रमासिक बिलात ५० टक्के सवलत दिली जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Krushi sanjivani scheme in nashik district
First published on: 05-07-2014 at 02:45 IST