नदीवाटे होणाऱ्या पाणीपुरवठय़ाऐवजी थेट जलवाहिनीद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठा योजना किफायतशीर असल्याचे बोलले जात असले तरी त्यात जलवाहिन्यांना वारंवार होणाऱ्या गळतीमुळे पाणीपुरवठा खंडित व विस्कळीत होण्याचे प्रकार वाढण्याचे प्रकार सोलापूर जिल्ह्य़ात विशेषत: सोलापूर व अक्कलकोट या शहरांमध्ये घडत आहेत. त्यामुळे सध्याच्या दुष्काळी स्थितीत पाण्याचा अपव्यय सातत्याने होत असून त्याचा फटका शहरवासीयांना सहन करावा लागत आहे.
सोलापूर शहरासाठी उजनी धरण ते सोलापूर थेट पाईपलाईन योजनेद्वारे पाणीपुरवठा होतो. याशिवाय विजापूर रस्त्यावर भीमा नदीवरील टाकळी-औज बंधाऱ्यातून, तसेच तुळजापूर रस्त्यावरील हिप्परगा तलावातून शहराला पाणी मिळते. यापैकी उजनी धरण ते सोलापूर थेट पाईपलाईन पाणी योजना महत्त्वाची व आश्वासक असली तरी या पाणी योजनेला जलवाहिन्यांना गळती लागण्याचे प्रकार वरचेवर वाढत आहेत. सुमारे शंभर किलोमीटर अंतराच्या या पाणी योजनेतील जलवाहिन्या फोडण्याचे प्रकार वाढत असताना त्यावर देखरेख तथा नियंत्रणठेवण्यासाठी व देखभालीसाठी पालिकेची यंत्रणा कार्यरत आहे. परंतु ही यंत्रणा अपुरी पडत असल्याने या कामाचे खासगीकरण झाले आहे. खासगी एजन्सीकडे हे काम सोपविण्यात आले असले तरी प्रत्यक्षात जलवाहिन्यांना गळती होण्याचे प्रकार थांबत नाहीत. अलीकडे तर वाटेत काही ठिकाणी जलवाहिन्या फोडून त्यातील पाणी चक्क टँकरमध्ये भरून त्याची विक्री करण्याचे प्रकार उघडकीस आले होते. त्याबद्दल ओरड होताच पालिका प्रशासनाला कठोर भूमिका घेणे भाग पडले. सद्य:स्थितीत उजनी-सोलापूर पाणी योजनेतील जलवाहिन्यांची गळती काही प्रमाणात आटोक्यात आली आहे.
तथापि, टाकळी-औज पाणी पुरवठय़ाच्या जलवाहिन्यांच्या  गळतीचे प्रमाण वाढले आहे. या योजनेतील वडगबाळजवळील १.६ किलोमीटर अंतराची जलवाहिनी खराब झाली होती. ही जलवाहिनी नव्याने कार्यान्वित करण्यासाठी राज्य शासनाने तीन वर्षांपूर्वी सोलापूर महापालिकेला भरीव निधी दिला होता. त्यानुसार काम हाती घेण्यात आले खरे; परंतु काम पूर्ण करण्याची एक वर्षांची मुदत संपली तरी अद्याप हे काम पूर्ण होऊ शकत नाही. संबंधित मक्तेदाराला वारंवार मुदत दिली जाते. त्यामुळे अधुनमधून त्याचा फटका पाणीपुरवठय़ाला बसतो. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत ग्रामीण भागात पाणीटंचाईचा प्रश्न भीषण ठरत असताना या जलवाहिन्या फोडण्याचे प्रकार वाढले आहेत. गुरूवारी हत्तूर येथे जलवाहिनी फोडण्यात आली. सकाळी आठच्या सुमारास हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर हत्तूर येथील हॉटेल व्यावसायिक प्रशांत सलगरे यांनी ही बाब पालिका प्रशासनाला कळविली. परंतु त्याकडे दुर्लक्ष झाले.  त्यामुळे साहजिकच या फुटलेल्या जलवाहिनीतून लाखो लिटर पाणी वाया गेले. दुपारी दोननंतर पालिका प्रशासनाला जाग आली आणि आयुक्त अजय सावरीकर हे स्वत: त्याठिकाणी गेले. त्यानंतर प्रत्यक्ष जलवाहिनी दुरूस्तीचे काम सुरू झाले.
सध्याच्या पाणीटंचाईमुळे पालिका प्रशासनाने एक दिवसाआडऐवजी दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे धोरण आखले आहे. त्याबद्दल नाराजी असतानाच पालिका प्रशासनाकडूनच पाण्याचा अपव्यय टाळण्याचे कर्तव्य पार पाडण्यात कर्तव्यकुचराई होत असल्याचे दिसून येते.
अक्कलकोट येथे तर सध्या पाणीटंचाईचा प्रश्न आणखी गंभीर बनला आहे. स्वामी समर्थ महाराजांच्या या नगरीत बारा दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. या शहरासाठी २७ किलोमीटर अंतरावर भीमा नदीवरील हिळ्ळी बंधाऱ्यातून पाणी उचलले जाते व थेट पाईपलाईनद्वारे अक्कलकोटपर्यंत आणले जाते. परंतु सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत वाटेत अनेक ठिकाणी या पाणी योजनेच्या वाहिन्या फोडल्या जातात. यात पाण्याचा मोठय़ा प्रमाणात अपव्यय होतो. पाणी बचत किंवा कपातीचे धोरण एकीकडे आखले जात असताना दुसरीकडे जलवाहिन्यांच्या गळतीमुळे लाखो लिटर पाणी अक्षरश: वाया जाते. त्यामुळे अक्कलकोट नगरपरिषदेची डोकेदुखी वाढली आहे. अर्थात, या फोडलेल्या जलवाहिन्या दुरूस्त करण्यासाठी विलंब होतो. त्यामुळे अर्थातच त्याचा मोठा परिणाम पाणीपुरवठय़ावर होतो. सुमारे पन्नास हजार लोकसंख्येच्या अक्कलकोट नगरीत दर बारा दिवसांनी पाणीपुरवठा होत असल्यामुळे स्थानिक नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.