चार राज्यांतील निवडणुकीनंतर आगामी लोकसभा आणि त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुका बघता राजकीय पक्ष संघटनांमध्ये फेरबदल केले जात अहेत. स्थानिक पातळीवर नेतृत्वामधील फेरबदलाची चर्चा रंगू लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये शहर अध्यक्षांसह कार्यकारिणीमध्ये फेरबदलाची चर्चा होऊ लागली असून काही कार्यकर्ते सक्रिय झाल्याची माहिती मिळाली.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फेरबदलांचे संकेत मिळाले असून त्या दृष्टीने काही कार्यकत्यार्ंनी वरिष्ठांकडे मागणी केली आहे. शिवाय आगामी लोकसभा निवडणुका स्वतंत्रपणे लढण्याचे संकेतही पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्वाने दिले आहेत, त्यामुळे स्थानिक नेतृत्व सगळ्यांना घेऊन चालणारे असावे अशी मागणी केली जात असल्यामुळे नेतृत्व बदलाची चर्चा होऊ लागली आहे.
भारतीय जनता पक्षामध्ये स्थानिक पातळीवर विविध समित्यांची कार्यकारिणी आणि शहर कार्यकारिणी घोषित करण्यात आली असली तरी त्यातही फेरबदल होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष अजय पाटील यांना पक्षाच्या एका गटाकडून विरोध असल्यामुळे अनेक कार्यकर्ते दुखावले गेले आहेत. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात पक्षाचे काही कार्यकर्ते दुखावले गेल्याची चर्चा होती. अजय पाटील यांना बदलविण्यात यावे, अशी मागणी पक्षातील काही प्रमुख कार्यकत्यार्ंनी अधिवेशन काळात केली होती, मात्र त्यावेळी वरिष्ठ नेत्यांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. मधल्या काळात पाटील यांच्या कार्यशैलीमुळे अनेक कार्यकर्ते दुखावल्यामुळे त्यातील काहींनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्यावेळी प्रदेशाध्यक्षांची भेट घेऊन त्यांच्यासमोर पाटील यांचे नेतृत्व बदलण्याची मागणी केली. त्या संदर्भात पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी कार्यकर्त्यांंच्या मागणीला फारसा प्रतिसाद दिला नसल्याची चर्चा असली तरी नेतृत्व बदलण्याशिवाय पर्याय नाही, असे पक्षातील काही कार्यकर्ते उघडपणे बोलू लागले आहेत.  काँग्रेसमधील वेगवेगळ्या गटातील कायकर्त्यांंना विश्वासात घेऊन काम करण्याची काँग्रेसचे शहर अध्यक्ष जयप्रकाश गुप्ता यांची ख्याती असली तरी गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या नेतृत्वावर काँग्रेसमधील एक गट नाराज असल्याचे बोलले जात आहे. जयप्रकाश गुप्ता हेच शहर अध्यक्षपदी कायम राहतील, असे पक्षाच्या प्रदेशच्या नेत्यांनी स्पष्ट केले असले तरी गुप्ता यांच्याविषयी नाराजी कायम आहे. चार राज्यातील निवडणुकरीनंतर काँग्रेसच्या कार्यकर्ते कामाला लागले असून त्यांनी शहरात आणि जिल्ह्य़ात तयारी सुरू केली आहे. शिवाय आम आदमी पक्ष दिल्लीनंतर महाराष्ट्रात पाय रोवत असताना काँग्रेसचे कार्यकर्ते सक्रिय झाले. गुप्ता यांच्या अध्यक्षाच्या निवडीला काही स्थानिक प्रमुख नेत्यांनी विरोध केल्याची चर्चा असून त्यांनी महापालिकेतील विरोधी पक्ष नेते विकास ठाकरे यांचे नाव समोर केले आहे. विकास ठाकरे हे विलास मुत्तेमवार यांचे समर्थक असल्यामुळे त्यांच्या नावाची चर्चा आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ज्येष्ठ नेते हरिदास टेंभूर्णे यांनी पक्ष सोडल्यानंतर त्यांच्या जागेवर विभागीय अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. त्यातील काही कार्यकर्ते पक्षाचे सरचिटणीस डॉ. राजेंद्र गवई यांच्या संपर्कात आहेत. रिपब्लिकन पक्षातील काही ज्येष्ठ नेत्यांनी वेगवेगळे पक्ष स्थापन केले असले तरी रिपब्लिकन पार्टी ऑफ पार्टी हाच रिपब्लिकन कार्यकर्त्यांचा पक्ष असल्याचा दावा चळवळीतील कार्यकर्ते करीत आहेत. पक्षाला तरुण नेतृत्व हवे आहे. त्यामुळे शहर अध्यक्ष प्रकाश कुंभे, प्रा. बुद्धराज मून, वसंत हुमणे आणि विलास गजघाटे या चार नावांची चर्चा आहे. सध्या कर्नाटकमधील एन. राजेंद्रन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असले तरी डॉ. राजेंद्र गवई यांच्याकडे राज्याची जबाबदारी देण्यात आली आहे. या चारपैकी कोणाची वर्णी लागते याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.