जनावरांच्या कातडीची परस्पर विल्हेवाट लावण्याच्या प्रकरणातील निलंबित प्रभाग अधिकाऱ्यासह चौघांना पुन्हा कामावर रुजू करून घेतल्याचे आदेश देण्यात आले आहे.
शहरातील कासमवाडी परिसरात एका गोदामातून लाखो रुपयांची जनावरांची कातडी महापालिकेच्या पथकाने जप्त केली होती. पंचनाम्यानंतर ती कातडी जमिनीत पुरून टाकण्याचे आदेश देण्यात आले होते. ऑक्टोबर २०१२ मधील या घटनेत जेसीबीचालक महेश थोरात, लिपिक संजय पवार, आरोग्य निरीक्षक तथा अतिक्रमण विरोधी विभाग अधीक्षक एच. एम. खान आणि प्रभाग अधिकारी साहाय्यक अभियंता अरविंद भोसले यांनी संगनमताने कातडीची परस्पर विल्हेवाट लावल्याचे उघड झाले होते. कातडी जमिनीत पुरून नष्ट करण्याचे आदेश असताना संबंधितांनी शिरसोली रस्त्यावरील एका ठिकाणी जेसीबीच्या साहाय्याने खड्डा खोदून त्यात कातडी पुरल्याचा बनाव केला होता. खड्डय़ात कातडी न पुरता या लोकांनी ती परस्पर मूळ मालकालाच विकल्याचे उघड झाले होते.
या प्रकरणी अरविंद भोसलेसह खान, थोरात व पवार यांना निलंबित करण्यात आले. चौघांना आता प्रभारी आयुक्तांनी चौकशीअधीन राहून मूळ पदावर कामावर रुजू करून घेण्यात येत असून, या दरम्यान त्यांची चौकशी सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. एस. एम. वैद्य यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.