शुल्क न भरणाऱ्या विद्यार्थ्यांना वर्गात बसू न देण्याची शिक्षा करणाऱ्या शहरातील डीजीपीनगर- २ मधील लिटील फ्लॉवर स्कूलमधील प्रकारावर ‘नाशिक वृत्तान्त’ने प्रकाशझोत टाकल्यानंतर महापालिकेच्या शिक्षण मंडळाने कारणे दाखवा नोटीस बजावत या घटनेची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. आदल्या दिवशीच्या प्रकाराबद्दल मंगळवारी व्यवस्थापनाने पालकांची माफी मागत या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. सर्व विद्यार्थ्यांना वर्गात रितसर प्रवेश देण्यात आल्याचे पालकांनी सांगितले.
डीजीपीनगर-२ परिसरातील लिटील फ्लॉवर स्कूलमध्ये सोमवारी सकाळी जोपर्यंत थकीत शुल्क भरले जात नाही, तोपर्यंत विद्यार्थ्यांना वर्गात बसू दिले जाणार नसल्याचा इशारा देण्यात आला होता. त्यामुळे व्यवस्थापन व पालकांमध्ये मतभेद झाले. शुल्क भरण्यास स्कूलने काही दिवसांची मुदत द्यावी, ही आपली मागणी अमान्य करून कोणतीही चर्चा न करता विद्यार्थ्यांना थेट स्कूलबाहेर उभे करण्यात आल्याची तक्रार पालकांनी केली होती. यामुळे हतबल झालेल्या पालकांनी विद्यार्थ्यांना घेऊन घरी जाणे पसंत केले. काही विद्यार्थ्यांवर तर एकटय़ानेच घरी जाण्याची वेळ आली. पालकांनी दोषारोप केले असताना व्यवस्थापनाने मात्र असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे म्हटले होते. ज्या विद्यार्थ्यांचे शुल्क बाकी आहे, त्यांच्या पालकांना बोलविण्यात आले होते. तथापि, याचा काही पालकांना राग आल्याने ते पाल्यांना घरी घेऊन गेल्याचे संस्थेने नमूद केले. एकाही विद्यार्थ्यांला घरी पाठविले नसल्याचा दावाही व्यवस्थापनाकडून करण्यात आला.
या घडामोडीच्या पाश्र्वभूमीवर, पालिकेच्या शिक्षण मंडळाने गंभीर दखल घेत लिटील फ्लॉवर स्कूलची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी संबंधित स्कूलला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याची माहिती मंडळाचे प्रशासनाधिकारी नितीन उपासनी यांनी दिली. वास्तविक, कोणतीही शैक्षणिक संस्था वा स्कूलला शुल्क न भरल्याच्या कारणावरून विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा अधिकार नाही. या प्रकरणी पालकांनी कोणतीही तक्रार दिलेली नाही. शिक्षण मंडळाने संबंधित संस्थेकडे या घटनेविषयी खुलासा मागविला आहे. दरम्यान स्कूलमध्ये सकाळी व्यवस्थापन व पालक यांच्यात बैठक पार पडली. तासाभराहून अधिक काळ झालेल्या चर्चेत पालकांनी आदल्या दिवशीच्या प्रकाराबाबत संतप्त भावना व्यक्त केली. संस्था चालकांनी उपरोक्त घटनेबाबत माफी मागून या विषयाला येथेच पूर्णविराम देण्याची विनंती केल्याचे पालकांनी नमूद केले. पुढील काळात असे प्रकार होणार नाहीत, याची खबरदारी घेण्याचे आश्वासनही देण्यात आले. पालकांनी मग हा विषय अधिक ताणून न धरण्याचे निश्चित केल्याचे सांगितले जाते. व्यवस्थापनाने स्कूलचे कामकाज नियमितपणे सुरू असल्याचे स्पष्ट केले. आदल्या दिवशीही असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे मुख्याध्यापिकांकडून सांगण्यात आले. विद्यार्थी व शिक्षकांमध्ये भावनिक नाते आहे. यामुळे असा प्रकार घडला नसल्याचा त्यांनी वारंवार पुनरूच्चार केला.