शहरात पाणीप्रश्न पेटला असताना लोकप्रतिनिधी व प्रशासनात सुरू झालेल्या संघर्षांचा तिढा अद्याप सुटला नाही. मात्र या संघर्षांमुळे करदात्या नागरिकांचे हाल कायम आहेत. दरम्यान, प्रशासनाच्या विरोधात सोमवारी बहुजन समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेसमोर धरणे आंदोलन केले. तर सायंकाळी सभागृह नेते महेश कोठे यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्याचा तपशील समजू शकला नाही. उद्या मंगळवारी शहराच्या पाण्याच्याच प्रश्नावर महापालिकेची सर्वसाधारण सभा तसेच स्थानिक सर्वपक्षीय आमदारांची बैठक बोलावण्यात आली असून यात पाण्याबरोबर लोकप्रतिनिधी व प्रशासनातील संघर्ष गाजण्याची चिन्हे दिसत आहेत.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन उद्भवांपैकी विजापूर रस्त्यावरील भीमा-टाकळी योजनेतील पाणीसाठा संपुष्टात आल्याने शहरात जलसंकट कोसळले आहे. त्यामुळे एक दिवसाआड ऐवजी दोन दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागत आहे. केवळ प्रशासनाच्या बेफिकीरपणाच्या कारभारामुळे हे जलसंकट कोसळल्याची टीका होत आहे. भीमा-टाकळी योजनेतील पाणीसाठा संपुष्टात येत असताना त्याबद्दल वेळीच खबरदारीचे उपाय योजले गेले असते तर हे जलसंकट कोसळले नसते. तहान लागल्यानंतर विहीर खोदावी त्याप्रमाणे पाणीसाठा संपल्यानंतर उजनी धरणातील पाणी सोडण्यासाठी शासनाकडे आटापिटा करण्याची वेळ महापालिकेवर आली. तथापि, ठरलेल्या नियोजनानुसार उजनी धरणातून पाणी सोडले नाही. त्यामुळे परिस्थिती गंभीर बनली असताना अखेर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या आदेशाने उजनी धरणातून पाणी सोडावे लागले. हे पाणी टाकळी येथे पोहोचण्यास आणखी तीन दिवस लागणार आहेत.
या पाश्र्वभूमीवर शहरातील पाणीसंकटाकडे गाभीर्याने पाहिले जात असताना रूपाभवानी मदिराजवळील पाणी शुद्धीकरण केंद्रात (पाणी गिरणी) जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर्स पाणी वाया गेले. या घटनेकडे लक्ष वेधून देखील प्रशासनाने दुर्लक्षकेल्याने संतप्त तरुणांच्या जमावाने पाणी गिरणी कार्यालयावर हल्लाबोल करून तेथे नासधूस केली होती. अधिकाऱ्यांच्या अंगावर घाण पाणी टाकण्याचाही प्रकार घडला होता. या घटनेच्या निषेधार्थ प्रशासनातील आयुक्त अजय सावरीकर यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांनी सामूहिक रजा आंदोलन केले. त्यामुळे लोकप्रतिनिधी विरुद्ध प्रशासन यांच्यातीस संघर्ष चांगलाच पेटला आहे. या प्रश्नावर सत्ताधारी काँग्रेस आघाडीची हतबलता दिसून येते. महापौर अलका राठोड यांच्या आवाहनाला न जुमानता आयुक्त सावरीकर यांच्या नेतृत्वाखाली अधिकाऱ्यांनी केलेल्या आंदोलनामुळे महापालिकेच्या प्रतिष्ठेला बाधा पोहोचली असून यात लोकप्रतिनिधी व प्रशासन दोघेही टीकेचा विषय ठरले आहेत. या पाश्र्वभूमीवर बसपाच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेसमोर धरणे आदोलन केले. नगरसेवक आनंद चंदनशिवे व उषा शिंदे यांच्यासह सुमारे शंभर कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होते. दरम्यान, उद्या मंगळवारी दुपारी भाजपच्या वतीनेही प्रशासनाच्या विरोधात महापालिकेवर मोर्चा काढण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Local corporators strife against administration on water problem continued
First published on: 07-01-2013 at 08:24 IST